साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र
मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची जागा बळकावण्याचा प्रकार हा लोकशाही नाकारण्यासारखा आहे. याविरोधात एकत्र येऊन लढा उभारण्याची हाक सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी दिली. ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बचाव कृती समिती’च्यावतीने सोमवारी मुंबई ग्रंथ संग्रहालयाच्या दादर पूर्व येथील नायगाव शाखेमध्ये आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या.
ग्रंथसंग्रहालयाच्या नायगाव शाखेतील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या काही दिवसांपासून थकित ठेवले होते. थकित पगारासाठी कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवडय़ात आंदोलन केले. त्यानंतर पगार दिले असले तरी संग्रहालयाची ही शाखा मान टाकण्याच्या धारेवर असल्याचे भासविले जात आहे. शाखा वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिकांचा समावेश असलेल्या मुंबई मराठी गं्रथ संग्रहालय बचाव कृती समिती’ची बैठक सोमवारी नायगावच्या संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित केली होती. या सभेत साहित्यिक रत्नाकर मतकरी, सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिंदे, अनिल गलगली, हेमंत देसाई, राजन राजे, यशवंत किल्लेदार आदी मान्यवर उपस्थित होते. सभेसाठी ऐनवेळी सभागृह नाकारण्यात आल्याने सभा संस्थेच्या प्रांगणात घेतली गेली.
संग्रहालयाची ही जागा वाचविण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार या सभेत केला गेला. शंभर वर्षे जुनी ही संस्था टिकायला हवी. मराठी शाळा, मराठी ग्रंथसंपदा वाचविण्यासाठी एकत्रित पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत मेधा पाटकर यांनी यावेळी व्यक्त केले.
बंद पडलेले शारदा चित्रपटगृह, कमी होत चाललेल्या शाखा, वाचकांची रोडावत असलेली संख्या, नायगावमधली अडीच एकरची मोक्याची जागा, कर्मचाऱ्यांचे थकलेले पगार या सर्व मुद्दय़ांबद्दल या सभेत चर्चा झाली. संस्थेच्या कार्यकारिणीची भूमिका ही ग्रंथालय संपविण्याची आहे,असा आरोप मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संस्थेचे अध्यक्ष असताना या संस्थेची वाताहत का होते, असा सवालही यावेळी करण्यात आला.
ग्रंथालय वाचविण्यासाठी समाजातील सर्व सुजाण नागरिक, साहित्यिक, सनदी अधिकाऱ्यांनी पुढे येण्याचे आवाहन साहित्यिक विजय तापस यांनी केले. संस्था मुंबईचे सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी मागणी करीत असताना साहित्यिक रत्नाकर मतकरी म्हणाले की, ‘वेळीच हे ग्रंथालय वाचविले नाहीतर या जागेवर टोलेजंग इमारत उभारली जाईल.’
ग्रंथ संग्रहालयाच्या ४४ शाखांपैकी २९ शाखा उरल्या आहेत. ‘ग्रंथालय वाचवा, मराठी वाचवा’, असा नारा देत बंद झालेल्या १५ शाखा पुनरुजीवित कराव्यात, असा ठराव करण्यात आला. संस्थेत संशयास्पद कारभार सुरू आहे, त्याचा शोध घेण्यासाठी साहित्यिक विजय तापस, सुनील कर्णिक, व्हीजेटीआयचे संजय मंगो, अॅड. सुरेखा दळवी यांची समिती स्थापन करण्यात आली.