मुंबई : महाराष्ट्रासह देशभर राबविल्या जाणार्‍या मतदार याद्यांची ‘विशेष सखोल फेरतपासणी’ (एसआयआर) ही मोहीम बेकायदेशीर असून ती संपूर्णपणे रद्द करण्यात यावी, तसेच निवडणुका मतपत्रिकेवर पुन्हा घेण्याची मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांनी गर्जना मोर्चाच्या वेळी केली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी तसेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी मोहिेमेच्या विरोधात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या गर्जना मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शेकाप, डावे पक्ष सहभागी झाले होते.

मेट्रो सिनेमागृहापासून ते महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा निघाला. मुंबई महापालिकेसमोर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर झालेल्या जाहीर सभेत निवडणूक आयोगाच्या विरोधात एकमुखी आवाज दुमदुमला. कुठल्याही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह न घेता केवळ तिरंगा आणि पांढर्‍या टोप्या घालून कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात यावी, अशी भूमिका या वेळी सर्व नेत्यांनी घेतली. या वेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, शेकापचे जयंत पाटील आदी विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबरच शिवसेनेचे सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनिल परब, मनसेचे अमित ठाकरे, बाळा नांदगावकर आदी नेते उपस्थित होते.

विधानसभा निकालावर संशय

लोकसभेनंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ४० ते ६० लाख मतदार कसे वाढले, असा प्रश्न करत राज ठाकरे यांनी या निकालावरच साशंकता व्यक्त केली. लोकसभेत भाजपला २ कोटी ४४ लाख मते मिळाली होती. ही आकडेवारी विधानसभेला ३.१६ कोटींवर कशी गेली, हा संशोधनाचा विषय आहे. मतदार यादीतील घोळामुळेच २०२४ची विधानसभा निवडणूक भाजप जिंकू शकली, असा आरोप त्यांनी केला.

माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांच्या वक्तव्याचा हवाला देत राज ठाकरे यांनी, देशभर सरसकट सुरू असलेला ‘एसआयआर’च बेकायदेशीर असल्याचा दावा केला. कुणाला सत्तेत बसवायचे आणि कुणाला विरोधात, हे या देशातील मतदार ठरवतील, निवडणूक आयोग नाही, असे स्पष्ट करत राज ठाकरे म्हणाले, एकाच उद्योगपतीला जंगले, जमिनी, विमानतळे, बंदरे देण्यासारखे मनमानी निर्णय सत्ताधारी कुठल्या आत्मविश्वासाच्या बळावर घेत आहेत? निवडणूक आयोगाला दावणीला बांधल्याशिवाय हा विश्वास येणार नाही.

आणि अशीच परिस्थिती राहिली तर या देशातील जनतेने कितीही आंदोलने केली, मोर्चे काढले तरी काही फरक पडणार नाही. सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षाला सत्ता जाण्याची भीती असते. अशी कोणतीही भीती महाराष्ट्रात अथवा दिल्लीत भाजपला दिसत नाही. कारण निवडणूक आयोग त्यांच्या पाठीशी असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

हुकूमशाहीला इथल्या मातीत गाडू. : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करत, महाराष्ट्राची जनता या हुकूमशाहीला इथल्या मातीत गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा दिला. सध्याचे सरकार प्रशासन चालवण्याऐवजी केवळ सूड उगवण्याचे राजकारण करत आहे. आणि त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. सत्तेच्या मोहात अंध होऊन जनतेच्या अधिकारांवर डल्ला मारणार्‍यांनी हिटलरचा इतिहास विसरू नये, असा टोला लगावत, बळाचा वापर करणार्‍या हिटलरला शेवटी स्वत:च्याच कृतीमुळे जगातून नष्ट व्हावे लागले होते, याची आठवण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला करून दिली. निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांमधील घोळावर उद्धव ठाकरे यांनी बोट ठेवले.

देशात जिथे जिथे विरोधकांचे बळ वाढते आहे, तिथे तिथे जाणीवपूर्वक मतदारांची नावे गाळण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१४ मध्ये ‘व्होट अगेन्स्ट करप्शन’ अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या भाजपविरोधात आता ‘इंडिया अगेन्स्ट व्होट चोर’ असा नारा देण्याची वेळ आल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरताना उद्धव ठाकरे यांनी, ठाण्यातील पूर्णेकर यांची हत्या आणि देशभरात महिलांवर होणार्‍या अत्याचारांचा दाखला दिला.

तुमचे हिंदुत्ववादी सरकार नक्की कुठे आहे, असा सवाल करत त्यांनी प्रशासकीय संस्था ताब्यात घेतल्या तरी उद्या सत्ताधार्‍यांना रस्त्यावर फिरणे मुश्कील होईल, असा इशारा दिला. महाराष्ट्रातील मराठी माणूस, शेतकरी आणि जनतेचा घात करणारा हा बेकायदेशीर ‘एसआयआर’ प्रकार तातडीने रद्द करण्याची मागणी करत, मतांची चोरी करणार्‍यांना जनता सत्तेवरून खेचून खाली आणल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.