मुंबई : कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तंबाखू सोडल्याने काहीच फायदा होत नाही, हा समज चुकीचा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या (आयएआरसी) नव्या दीर्घकालीन अभ्यासातून समोर आले आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर धूम्रपान सोडणाऱ्या रुग्णांचा मृत्यू वा कर्करोग वाढण्याचा धोका तंबाखूचे सेवन सुरू ठेवणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत ५५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने २३ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पुराव्याधारित अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. फुफ्फुस आणि मूत्रपिंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांवर दशकाहून अधिक काळ लक्ष ठेवून हे निष्कर्ष काढण्यात आले.
आयएआरसीने मॉस्को येथील एन. एन. ब्लोखिन नॅशनल मेडिकल रिसर्च सेंटर ऑफ ऑन्कोलॉजीच्या सहकार्याने कर्करोगाचे निदान झाल्यानंतर धूम्रपान सुरू ठेवणाऱ्या आणि ते सोडणाऱ्या रुग्णांचा दीर्घकाळ अभ्यास केला. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या ५१७ रुग्णांच्या अभ्यासात निदानानंतर धूम्रपान सोडणारे रुग्ण जवळपास दोन वर्षे अधिक जगल्याचे आढळले. तसेच त्यांचा मृत्युचा धोका सुमारे एक तृतीयांशाने कमी झाल्याचे आढळले.
मूत्रपिंडाच्या कर्करोगाच्या २१२ रुग्णांच्या दुसऱ्या अभ्यासात धूम्रपान सोडणाऱ्या रुग्णांचा मृत्युचा धोका निम्म्याने कमी झाला. तसेच कर्करोग वाढण्याचा किंवा शरीरात पसरण्याचा धोका निम्म्यापेक्षाही अधिक कमी झाल्याचे आढळले. काही कर्करोगांमध्येही धूम्रपान सोडण्याचा फायदा झाल्याचे अभ्यासात नमूद आहे. या पार्श्वभूमीवर आयएआरसीने राष्ट्रीय कर्करोग उपचार मार्गदर्शक तत्त्वे आणि गुणवत्तेच्या निकषांमध्ये तंबाखू उपचाराचा समावेश करावा, तसेच उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याबाबत प्रशिक्षण द्यावे, अशी शिफारस केली आहे.
भारतासमोरील आव्हान
भारतात मोठे आव्हान हे चघळण्याच्या तंबाखूचे आहे. भारतात २६.७ कोटी म्हणजेच २८.६ टक्के प्रौढ तंबाखूचे सेवन करतात. ‘ग्लोबल अडल्ट टोबॅको सर्व्हे-२’नुसार (२०१६-१७) यात मोठी संख्या खैनी, पान आणि गुटखा यांसारख्या चघळण्याच्या तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करणाऱ्यांची आहे. आयएआरसीचे उपलब्ध अभ्यास धूम्रपान करणाऱ्या रुग्णांवर झाले आहेत. गुटखा, खैनी, मावा किंवा पानाच्या माध्यमातून तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये तंबाखू सोडल्यानंतर जगण्याच्या शक्यतेत होणाऱ्या बदलाबाबत दीर्घकालीन माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे ‘ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट’, ‘रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर’ (ॲक्टरेक) या विषयावर दीर्घकालीन आणि लोकसंख्याआधारित संशोधन करण्यावर भर देत आहे.
तंबाखू सोडणे हा उपचाराचा भाग
कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तंबाखू सोडण्याची रुग्णाची तयारी अधिक असू शकते. त्यामुळे तंबाखू सोडण्यास मदत करणे हा शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा केमोथेरपीइतकाच उपचाराचा भाग मानला पाहिजे. भारतात बहुतांश तंबाखू सेवन चघळण्याच्या स्वरूपात असल्याने अशा तंबाखूसाठीही दीर्घकालीन पुरावे निर्माण करण्यावर ‘ॲक्टरेक’ काम करणार असल्याचे ‘ॲक्टरेक’चे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले.
