कर्करोग रुग्णांची वणवण

आठवडाभर पेट स्कॅन तपासणी बंद असल्यामुळे रुग्णांना वणवण करावी लागत आहे.

पेट स्कॅन तपासणीसाठी आवश्यक इंजेक्शन तयार करण्याचे उपकरण दुरुस्तीला

टाटा रुग्णालयातील कर्करोगावरील ‘पोझिट्रॉम एमिशन टोमोग्राफी’ (पेट स्कॅन) या तपासणीसाठी आवश्यक इंजेक्शन तयार करण्याचे उपकरण दुरुस्तीसाठी गेल्यामुळे विविध राज्यातून या तपासणी आलेल्या रुग्णांना वणवण करावी लागत आहे. टाटा रुग्णालयात देशभरातून दिवसाला साधारण १० रुग्ण पेट स्कॅन तपासणीसाठी येतात. मुंबईत लीलावती, जसलोक, बॉम्बे या रुग्णालयात ही तपासणी करणे खर्चीक असल्याने अधिकतर रुग्ण टाटा रुग्णालयातच उपचार करतात. मात्र आठवडाभर पेट स्कॅन तपासणी बंद असल्यामुळे रुग्णांना वणवण करावी लागत आहे.

झारखंड येथे एका खासगी कंपनीत काम करणारे अरुण कुमार बुधवारी पेट स्कॅन तपासणीसाठी टाटा रुग्णालयात आले होते. मात्र त्यासाठी लागणारी आवश्यक यंत्रणा दुरुस्तीसाठी गेल्यामुळे अरुण कुमार यांना पुढील आठवडय़ात येण्यास सांगितले. इतर रुग्णालयातही पेट स्कॅन तपासणीसाठी मोठी प्रतीक्षा यादी असल्यामुळे अरुण कुमार यांना मुंबईतच वास्तव्य करावे लागणार आहे.

टाटा रुग्णालयातील खासगी विभागात पेट स्कॅन तपासणीसाठी १७ हजार किंमत आकारली जाते, तर बॉम्बे रुग्णालयात २२ हजार आणि जसलोक रुग्णालयात २४ हजार पाचशे रुपये आकारले जाते. या तुलनेत टाटा रुग्णालयात सर्वात कमी तपासणीची किंमत असल्यामुळे अधिकतर रुग्णांना येथे तपासणी करणे शक्य असते.  पेट स्कॅन तपासणीसाठी आवश्यक असलेले इंजेक्शन टाटाच्या संशोधन विभागातून आणले जाते, असे टाटा रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. सईद जाफरी यांनी सांगितले.

प्राथमिक पातळीवरील रुग्णांना उपयोग

पेट स्कॅनद्वारे शरीरातील जैविक तपासणी केली जाते. ज्यामध्ये शरीरातील कर्करोगाच्या पेशी कुठे व किती प्रमाणात आहे याची माहिती मिळते. सिटी स्कॅनमध्ये रचनात्मक माहिती मिळते. तर पेट स्कॅनमुळे पेशींमधील कर्करोग किती प्रमाणात वाढला आहे किंवा वाढण्याची शक्यता आहे, याचीही माहिती मिळते. पेट स्कॅन तपासणी करण्यापूर्वी रुग्णाला ग्लुकोज व रेडिओन्यूक्लाइड घटकांचा समावेश असलेले इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर रुग्णाची पेट स्कॅन उपकरणातून तपासणी केली जाते. या उपकरणातील  गॅमा यंत्राच्या साहाय्याने कर्करोगाच्या पेशींचे छायाचित्र काढले जाते. यामुळे या एकाच तपासणीतून कर्करोग किती पसरला आहे ही माहिती डॉक्टरांना कळते. ही प्रक्रिया अतिशय उपयुक्त असून प्राथमिक पातळीवरील रुग्णांना व ज्यांच्या शरीरात कर्करोग पसरतो आहे, अशी लक्षणे दिसल्यास पेट स्कॅन तपासणी करण्यास सांगितले जाते, असे कामा रुग्णालयातील कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. दीपक निकम यांनी सांगितले. कर्करुग्णांवर लवकरात लवकर उपचार करणे आवश्यक असते, त्यामुळे त्यांच्यावरील तपासणी हे लवकर करणे आवश्यक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cancer patients issue

ताज्या बातम्या