कर्करोगासारख्या दुर्धर आजारात रुग्णांना आत्मविश्वास आणि आनंद देणे महत्त्वाचे आहे. ‘एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ ऑन्कोलॉजी’च्या माध्यमातून कर्करोगग्रस्तांवर उपचार करण्यासाठी सुरू होत असलेलेल्या ‘सोमय्या आयुर्विहार’ या अत्याधुनिक केंद्रात रुग्णांना आत्मविश्वासाबरोबरच माफक दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी अपेक्षा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी येथे व्यक्त केली.
शीव येथे सोमय्या रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ‘सोमय्या आयुर्विहार- एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ ऑन्कोलॉजी’चे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पद्मश्री डॉ. रमाकांत देशपांडे, पद्मश्री डॉ. सुरेश अडवाणी, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ. दीपक पारेख आणि सोमय्या संस्थेचे अध्यक्ष समीर सोमय्या आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.  एका कर्करुग्णाकडूनच या केंद्राचे उद्घाटन व्हावे, हा योगायोग असून परदेशात उपचार घेण्याचा सल्ला अनेकांनी दिला. मात्र आपल्या देशातही चांगले डॉक्टर असून उपचार पद्धतीही अधिक चांगल्या असल्यामुळेच आपण मुंबईत उपचार घेण्याचा निर्णय घेतला आणि आज आपण पूर्णपणे फीट असल्याचे शिंदे यांनी
स्पष्ट केले.  
कर्करुग्णांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी पुढाकार घेतलेले हे केंद्र केवळ देशातच नव्हे तर जगासाठी आदर्शवत ठरावे. मुंबईला जागतिक दर्जाचे आरोग्यदायी शहर बनविण्याच्या दृष्टीने ‘सोमय्या आयुर्विहार’ हे महत्त्वाचे पाऊल असून कर्करोग पीडितांसाठी येत्या तीन वर्षांत २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती समीर सोमय्या यांनी यावेळी दिली. तर या केंद्रात रुग्णांना माफक दरात चांगल्याप्रकारच्या सुविधा आणि उपचार देण्याबरोबरच संधोधन आणि नव्या पिढीतील डॉक्टरांना चांगले ज्ञान देण्याचे काम नामवंत डॉक्टरांकडून होईल, असे डॉ. रमाकांत देशपांडे यांनी सांगितले.