मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्य युद्धाचा परिणाम आता अधिक प्रकर्षाने जाणवू लागला आहे. विविध आजारांवरील उपचारासाठी भारतात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट झाली असून आयात करण्यात येणाऱ्या वैद्यकीय घटकांचाही तुटवडा जाणवू लागला आहे. किमोथेरपीदरम्यान होणारी केस गळती रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्कॅल्प कुलिंगसाठी वापरण्यात येणारे एजंट घेऊन येणारी जहाजे स्टेट ऑफ हॉर्मुझच्या आखातात अडकली आहेत. त्यामुळे देशामध्ये कुलिंग एजंटचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा वापर करणाऱ्या रुग्णांना १५ ते २० दिवस वाट पाहावी लागत आहे.
कर्करोगावरील उपचारामध्ये किमोथेरपी महत्त्वपूर्ण समजली जाते. किमोथेरपीमुळे कर्करोग रुग्णांचे केस गळतात. केस गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी किमोथेरपीदरम्यान डॉक्टरांकडून स्कॅल्प कुलिंगचा वापर केला जातो. स्कॅल्प कुलिंग पद्धत ही किमोथेरपी सत्रांच्या पूर्वी आणि सत्रांनंतर वापरली जाते. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकामुळे डोक्यातील रक्तवाहिन्या अरुंद होतात. त्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचणाऱ्या केमोथेरपीचे प्रमाण कमी केले जाते, परिणामी, केमोथेरपीमुळे होणारी केसगळती कमी होते. स्कॅल्प कुलिंग पद्धतीमध्ये एक प्रकारचे हेल्मेट रुग्णांच्या डोक्यात घातले जाते. या हेल्मेटमध्ये वापरले जाणारे कुलिंग एजंट हे रक्तवाहिन्या अरुंद करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
हे कुलिंग एजंट परदेशातून आयात करावे लागते. मात्र मागील अनेक दिवसांपासून अमेरिका, इस्रायल – इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हे कुलिंग एजंट भारतात आणणारी जहाजे स्टेट ऑफ हॉर्मुझच्या आखातात अडकली आहेत. परिणामी, स्कॅल्प कुलिंगमध्ये वापरण्यात येणारे कुलिंग एजंट बाजारामध्ये फारसे उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णालयामध्ये त्याचा तुटवडा जाणवत आहे. कुलिंग एजंटची आवश्यकता असलेल्या रुग्णांना किमान १५ ते २० दिवस वाट पाहावी लागत आहे.
स्कॅल्प कुलिंग या पद्धतीसाठी साधारणत: ५ ते १० हजार रुपये इतका खर्च येतो. त्यामुळे ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. असेच रुग्ण याचा वापर करतात. तसेच ही पद्धतीचा वापर बंधनकारक नाही. त्यामुळे जवळपास एक ते दीड हजार रुग्णांमागे एक रुग्ण या पद्धतीचा वापर करताे. या पद्धतीचा वापर फारच कमी होत असल्याने मोजकेच कुलिंग एजंट साठवले जातात, अशी माहिती ऑन्को तज्ज्ञ डॉ. प्रीतम जैन यांनी दिली.
स्कॅल्प कुलिंग पद्धतीमध्ये रुग्णाच्या डोक्यामध्ये हेल्मेटसारखे यंत्र घालण्यात येते. स्कॅल्प कुलिंग हे बंधनकारक नाही. श्रीमंत रुग्णांकडून याला प्राधान्य दिले जाते. कर्करोगावरील उपचार महाग असताना सर्वसामान्य रुग्णांकडून हा अतिरिक्त खर्च टाळला जातो. त्यामुळे याचा वापर फारच कमी रुग्णांकडून केला जातो. त्याचा तुटवडा निर्माण झाला असला तरी अद्यापपर्यंत तो जाणवत नसल्याचे बॉम्बे रुग्णालयातील कर्करोग तज्ज्ञ व विभाग प्रमुख डॉ. दिलीप निकम यांनी सांगितले.
