मुंबई : आकाशात ३५ हजार फुटांवर कॉकपिटमध्ये सह-वैमानिकाकडून झालेल्या प्राणघातक चाकूहल्ल्यात गंभीर जखमी असतानाही अतुलनीय शौर्य दाखवून २७ निष्पाप बालकांसह तब्बल १८० प्रवाशांचे प्राण सुखरूप वाचवणारे फ्लाय दुबईचे धाडसी पायलट, मूळ मुंबईकर असणारे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबियांची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी रविवारी भेट घेतली.

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात ३० सप्टेंबर रोजी घडलेल्या जीवघेण्या प्रसंगात कॅप्टन स्मित मच्छार यांनी रक्ताच्या थारोळ्यात असतानाही असीम संयम दाखवत आणि विमानाचे यशस्वी इमर्जन्सी लँडिंग करून नवा इतिहास घडवला. त्यांच्या या धाडसाचे देशाच्या पंतप्रधानांसह जगभरातील नेत्यांनी कौतुक केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील घाटकोपर (पूर्व) येथील ”धवलगिरी” इमारतीत वास्तव्यास असणारे कॅप्टन स्मित यांचे चुलते किशोर मच्छार यांच्या निवासस्थानी जाऊन महापौर रितू तावडे यांनी भेट घेतली. त्यावेळी स्मित यांच्या प्रकृतीची माहिती घेत विचारपूस केली. तसेच स्मित यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली. विशेष म्हणजे, रितू तावडे नगरसेवक म्हणून ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात, त्याच प्रभागात मच्छार यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यानंतर महापौरांनी संपूर्ण प्रभाग आणि मुंबईकरांच्यावतीने मच्छार कुटुंबियांना पाठबळ दिले. त्यावेळी आमदार पराग शाह, नगरसेवक धर्मेश गिरी, नगरसेविका राखी जाधव आदी उपस्थित होते.