मुंबई : संयुक्त अरब अमिरातीतून इस्रायलला १७४ प्रवाशांना घेऊन जाणारे ‘फ्लाय दुबई’ विमान पाडण्याचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक स्मित मच्छार यांना शौर्य पुरस्कार देण्याची मागणी जोर धरत आहे. हवाई दलाचे माजी लढाऊ वैमानिक विंग कमांडर अविनाश चिकटे (निवृत्त) यांनी १४ वर्षांपूर्वी स्मित मच्छारसोबत पहिले उड्डाण केले होते. स्मितने एका व्यावसायिक वैमानिकाच्या कर्तव्यपलिकडे जाऊन प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने स्मित मच्छार यांना शौर्य पुरस्कार द्यावा, अशी त्यांनी मागणी केली.

‘फ्लाईदुबई’ विमानाच्या कॉकपिटमध्ये सहवैमानिकाने कॅप्टन मच्छार यांच्यावर चाकूने वार केल्यामुळे विमान जवळपास १४,००० फूट खाली कोसळले होते. या घटनेनंतर, वैमानिक मच्छार यांनी सुरक्षितपणे विमान सौदी अरेबियात उतरवले. वैमानिक मच्छार जखमी झाले आहेत. वैमानिक मच्छार यांच्या सोबत माजी लढाऊ वैमानिक विंग कमांडर अविनाश चिकटे (निवृत्त) यांनी काम केले आहे. स्मित सोबतच्या आठवणी सांगताना विंग कमांडर अविनाश चिकटे यांनी नावाप्रमाणेच स्मित नेहमी हसतमुख असायचा. माझा तरुण मित्र जखमी झाल्याचे दुःख आहे, पण ज्या प्रकारे त्याने कॉकपिटमधील एक अत्यंत असामान्य परिस्थिती हाताळली, त्याचा प्रचंड अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

‘क्रॅश ॲक्स’ कुऱ्हाडीचा हल्ल्यासाठी वापर झाल्याची शक्यता

विमानचालन क्षेत्रात ४५ वर्षे काम केले आहे. प्रवासी, केबिन क्रू, वैमानिक किंवा इतरांना इजा पोहोचवण्यासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी कसून तपासणी केली जाते. मात्र कॉकपिटमध्ये एक कुऱ्हाड असल्याचे अविनाश चिकटे यांनी सांगितले. ‘क्रॅश ॲक्स’ म्हटली जाणारी ही कुऱ्हाड, अपघातानंतर अडकलेला कॉकपिटचा दरवाजा किंवा खिडकी तोडण्यासाठी वैमानिकांना मदत करते.

सह-वैमानिकाने वैमानिकांवर हल्ला करण्यासाठी त्या कुऱ्हाडीचा वापर केला असल्याची शक्यता चिकटे यांनी व्यक्त केली आहे.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जलद प्रतिसाद पुस्तिका

उड्डाणाच्या सर्व टप्प्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी एक जलद प्रतिसाद पुस्तिका आहे. कॅप्टन आणि सह-वैमानिक यांनी एक संघ म्हणून काम करावे. विमान व प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे परिस्थिती हाताळावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. चिकटे यांनी स्मितसोबत २०१२ मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने ”स्टार्टल इफेक्ट”चे वर्णन अचानक, तीव्र आणि अनपेक्षित घटनेला मिळणारी एक स्वयंचलित शारीरिक प्रतिक्रिया म्हणून केले आहे.

स्मितने एका व्यावसायिक वैमानिकाच्या कर्तव्यपलिकडे जाऊन प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने स्मित मच्छार यांना शौर्य पुरस्कार द्यावा, अशी त्यांनी मागणी केली.