मुंबई : मुंबईजवळ अरबी समुद्रात शनिवारी एक मालवाहू नौका बुडाली. त्यामुळे नौकेतील तिघांनी उडी मारली. त्यांना वाचवण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.  मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे मालवाहू नौकेमध्ये माल भरण्यात आला. त्यानंतर त्या नौकेतून माल एका मोठय़ा जहाजात भरण्यात येणार होता. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नौकेत अचानक पाणी शिरू लागले. त्यामुळे नौकेतील तिघांनी भीतीपोटी समुद्रात उडी मारली. दुसऱ्या बोटीतील कर्मचाऱ्यांनी तिघांनाही वाचवल्याचे पोलिसानी सांगितले. बॅलार्ड पिअरजवळ हा प्रकार घडला. वाचण्यात आलेल्या तिघांचा जबाब नोंदवण्यात आला असून प्राथमिक माहितीनुसार नौकेच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.