मुंबई : देशातील दोन हजाराहून अधिक सामाजिक संस्थांचे आधारवड असलेले ‘केअरिंग फ्रेंड्स नेटवर्क’चे संस्थापक रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते.

रमेशभाई कचोलिया २९ जून रोजी लीलावती रुग्णालयात नियमित वैद्यकीय तपासणीसाठी गेले असतानाच त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वरळीतील रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४.३० च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. कचोलिया यांच्या पश्चात मुलगा आशिष आणि वैभव ,पत्नी लता, सुना – नातवंडे असा परिवार आहे. कचोलिया यांनी ‘केअरिंग फ्रेंड्स’ या समविचारी मित्रांच्या मदतीने देशातील असंख्य संस्थांना संसाधने, वैचारिक अधिष्ठान, ऊर्जा, प्रेरणा आणि कार्याची नवी दिशा दिली.

२० मे १९३७ रोजी जन्मलेल्या रमेशभाई यांचे वडील विदर्भातील अकोले येथील कापड गिरणीत काम करीत होते. त्यांचे बालपण चाळीतील एका लहान खोलीत अत्यंत गरिबीत गेले. त्यांनी नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले. कष्ट करीत त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. चरितार्थासाठी मुंबईत आल्यावर त्यांनी कायदा आणि व्यवस्थापनाचे अभ्यासक्रमात आपली कुशाग्र बुद्धिमत्ता सिद्ध केली. झेनिथ, बिर्ला उद्योग समूह इत्यादी ठिकाणी काम करताना कर्तृत्व सिद्ध केले. १९८० साली कुष्ठरुग्णांसह अन्य वंचितांसाठी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून कार्यरत साधनाताई आणि बाबा आमटे यांची आनंदवनात भेट घेतली.

मुंबईत दिव्यांगांच्या ‘स्वरानंदवन’ या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी उभा केला. रमेशभाईंनी सेवाकार्याच्या नैतिक प्रेरणांना आजन्म प्रोत्साहित केल्याचे डॉ. विकास आमटे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

” रमेशभाई यांनी सर्व सामाजिक संस्थांना एकमेकांशी जोडले. आपली संसाधने, अनुभव आणि नव्या कल्पना यांची देवाणघेवाण करण्याची सेवासंस्कृती सर्व संस्थांमध्ये रुजवली. “

  • जयाताई जोगदंड,अध्यक्षा, स्नेहालय.