‘राज ठाकरे म्हणजे बोलघेवडा पोपट’

राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला उत्तर देणारे एक व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल होते आहे ज्यात राज ठाकरेंना बोलघेवडा पोपट म्हटले गेले आहे

राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवर काढलेले व्यंगचित्र भाजपा आणि त्यांच्या समर्थकांना चांगलेच झोंबल्याचे दिसून येते आहे. कारण राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्राला उत्तर देणारे व्यंगचित्र ‘पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आले आहे.

राज ठाकरेंनी काढलेल्या व्यंगचित्रात अनेक बदल करून हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरेंच्या रुपात एक पोपट दाखवण्यात आला आहे. त्याला बोलघेवडा पोपट असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर एका खुर्चीवर शरद पवार आणि एका खुर्चीवर राज ठाकरे बसले आहेत. साहेब बोला काय विचारू? असे राज ठाकरे यांनी विचारताच, पाळीव पत्रकारांनी सेट करून दिलेले मोदी विरोधी प्रश्नच विचारा उत्तर तयार आहे असे पवार म्हणताना दिसत आहेत. बारामतीच्या पोपटाने घेतलेल्या मुलाखतीत बारामतीच्या साहेबांनी मोदींवर पुन्हा टीका केली अशा बातमीचा मथळाही व्यंगचित्रात आहे. तसेच क्रोध मोदींच्या यशाचा असे शीर्षकही या व्यंगचित्राला देण्यात आले आहे. तर राज ठाकरे बसले आहेत त्यामागे राजाला साथ द्या या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत आणि मनसेचे इंजिन पुलावरून कोसळते आहे असे दाखवण्यात आले आहे. एक सेटिंगवाली मुलाखत असेही शीर्षक या व्यंगचित्राला देण्यात आले आहे.

एकंदरीतच काय जे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले आहे त्याच व्यंगचित्राची नक्कल करून राज ठाकरे यांची खिल्ली उडवणारे आणि त्यांना बोलघेवडा पोपट म्हटले आहे. गेल्या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोध मराठी मनाचा या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली होती त्याच मुलाखतीचा संदर्भ वापरून हे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे. पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९ हे भाजपाचे फेसबुक पेज नाही. मात्र त्यांच्या समर्थकांनी हे फेसबुक पेज तयार केले आहे. याच फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. आशिष शेलार यांनी गुरुवारीच राज ठाकरेंनी आता चला हवा येऊ द्या पाहात वेळ काढावा असा खोचक सल्ला दिला होता. त्यापाठोपाठ आता हे व्यंगचित्रही पोस्ट करण्यात आले आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cartoon on raj thakrey is viral on social media