मुंबई : बनावट कागपदपत्रांच्या आधारे महारेराची नोंदणी करणाऱ्या, तसेच ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ६५ विकासकांविरोधात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. पालिकेपाठोपाठ आता महारेरानेही ५२ विकासकांना दणका दिला आहे. बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप असलेल्या ५२ विकासकांची नोंदणी निलंबित करण्यात आली असून त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटीशीनुसार त्यांची सुनावणी होणार असून त्यानंतर नोंदणीबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. कल्याण-डोंबिवली शहरात अनधिकृत बांदकामांचा प्रश्न गंभीर आहे. अनधिकृत बांधकाम करणार्या विकासकांविरोधात कडक कारवाई होत नसल्याने अनधिकृत बांधकामे वाढत असल्याचा आरोप आहे.

अशात अनधिकृत बांधकामांना महारेरा नोंदणीद्वारे आळा बसेल असे वाटत असतानाच बनावट कागदपत्राद्वारे महारेरा नोंदणी केल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्यानुसार पालिकेच्या तपासणीत ६८बांधकाम परवानगी आदेश बनावट कागदपत्रांद्वारे परवानगी आदेश घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पालिकेने एकूण…विकासकांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. दुसरीकडे यातील ५२ विकासकांची यादी महारेराला सादर केली होती. या यादीची छाननी करत महारेराने अखेर ५२ विकासकांची नोंदणी निलंबित केली आहे. या विकासकांची यादी महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करत त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटीशीनुसार आता त्यांची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत दोषी आढळल्यास संबंधित विकासकाची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच जो दोषी आढळणार नाही त्यांची पुर्ननोंदणी केली जाणार असल्याची माहिती महारेरातील वरिष्ठ अधिकार्याने दिली.

हेही वाचा : अंबानी कुटुंबाला धमकी दिल्याप्रकरणी बिहारमधून एकजण ताब्यात

६५ जणांवर गुन्हे दाखल बनावट कागदपत्राद्वारे बांधकाम परवानगी घेणार्या आणि ग्राहकांची फसवणूक करणार्या ६७ विकासकांपैकी ६५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. २७ जणांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तसेच ३८ जणांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकार्याने दिली.