लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : कर्ज गैरव्यवहार करून न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे २४ कोटी ९३ लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांसह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी पैशांच्या बदल्यात कर्ज खाते बुडीत घोषित करून संबंधित कंपनीला मुद्दल व व्याजावर १८ कोटी ५६ लाखांची माफी देऊन हा अपहार केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. या संपूर्ण गैरव्यवहारासाठी आरोपींनी त्यांच्या कंपनीत सहा कोटी ३७ लाख रुपये हस्तांतरीत करून घेतले, असे तपासात उघड झाले आहे. बँकेच्या प्रभादेवी व गोरेगाव येथील कार्यालयातील तिजोरीत ठेवलेल्या १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी यापूर्वीही एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दादर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४०६, ४०९, ४१८ व १२०(ब) अंतर्गत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष रणजीत भानु (मृत), हिरेन भानु, उपाध्यक्ष गौरी भानु व कर्ज मंजूर करणाऱ्या अधिकारी व दोन कंपन्यांच्या संचालकांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहारानंतर मुंबई पोलिसांनी बँकेतील बुडीत कर्जाची चौकशी सुरू केली होती. त्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेकडे २०१० पासून बुडीत झालेल्या कर्ज खात्यांची माहिती मागितली होती. त्याप्रकरणी कर्ज देतानाही नियमांचे उल्लंघन केल्याबाबतचीही चौकशी सुरू केली होती. त्याबाबतच्या चौकशीत ही माहिती उघड झाली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वत: याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार करून गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

बँकेचे २४ कोटी ९३ लाखांचे नुकसान

● ३ सप्टेंबर २०१४ ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधील आरोपींनी कट रचून योग्य पडताळणी न करता एका खासगी कंपनीच्या गटाला ७७ कोटींचे कर्ज मंजूर केले.

● आरोपी हिरेन भानु, सुकेतुकुमार पटेल व अभिमन्यू भोअन यांनी या कंपनीचे व्यावसायिक व्यवहार दाखवून पावत्याच्या आधारे कर्ज रकमेतील सहा कोटी ३७ लाख रुपये स्वत:च्या कंपनीला हस्तांतरीत करून घेतले. तसेच त्या बदल्यात कर्ज देण्यात आलेल्या कंपनीचे कर्ज खाते बुडीत घोषित केले. त्यानंतर तडजोडीअंती कंपनीला देण्यात आलेली मुद्दल व व्याजामधील १८ कोटी ५६ लाख रुपये माफ केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संबंधित संचालक यांनी याबाबतचे निर्णय घेतले. त्यामुळे बँकेचे २४ कोटी ९३ लाख रुपयांचे नुकसान करून अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.