मुंबईः दहा महिलांसह सतरा परदेशी कलाकारांविरुद्ध दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भारतात काम करण्याचा परवाना नसतानातही चित्रफीतींसाठी काम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दहिसर येथील एस. एन दुबे रस्त्यावरील कोंकणीपाडा परिसरात २५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत चित्रीकरणासाठी परवानगी मिळावी यासाठी दहिसर पोलीस ठाण्यात अर्ज करण्यात आला होता. या अर्जाची शहानिशा केल्यानंतर त्यांना चित्रीकरणाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर तेथे एका मालिकेचे (वेब सिरीज) काम सुरु झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबईः कॅनडा येथे नोकरीचे आमिष दाखवून तीन तरुणांची फसवणुक

हेही वाचा >>> अडीच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी परदेशातून आलेल्या व्यावसायिकाला विमानतळावरून अटक

चित्रीकरणामध्ये काही परदेशी कलाकारांचा सहभाग होता. या कलाकारांकडे वैध परवाना नव्हता, तरीही ते तेथे चित्रीकरणासाठी आल्याची माहिती दहिसर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी दहिसर पोलिसांच्या एका विशेष पथकाने कारवाई करुन सतरा विदेशी कलाकारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यात दहा महिलांसह सात पुरुषांचा समावेश होता. त्यांच्याकडील कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर या कलाकारांकडे चित्रीकरणामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना नव्हता. त्यांचे पारपत्र, व्हिसा आणि इतर कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे या १७ कलाकारांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल होताच त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against foreign actors working india without a permit mumbai print news ysh
First published on: 28-11-2022 at 13:10 IST