लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : कांदिवली येथे व्यावसायिक नरेंद्र सोनकर यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी नरेंद्र यांनी केलेल्या चित्रीकरणात चिराग सावला आणि केतन सावला यांच्याकडून पैसे येणे असल्याने आणि त्यांच्याकडून झालेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी सावला बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कांदिवली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
सोनकर यांची पत्नी ममता सोनकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नरेंद्र सोनकर हे कापड व्यापारी होते. पूर्वी त्यांचा व्यवसाय मालवणी परिसरात होता. नंतर त्यांनी कांदिवलीतील गणेशनगर, आझाद कंपाऊंड परिसरात खुर्शी गारमेंट नावाने त्यांचा व्यवसाय सुरू केला. तेथे ५५ ते ६० कामगार कामाला होते. त्यांनी चिराग आणि केतन सावला यांच्या कंपनीसोबत व्यवहार केला होता. या कंपनीला ते कापड पुरवत होते. तक्रारीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून त्यांना सावला बंधूंकडून सुमारे २५ लाख रुपये बाकी होते. मात्र वारंवार विचारणा करूनही त्यांच्याकडून रक्कम मिळाली नाही. अनेकदा काम पूर्ण करून सावला बंधू त्यांना केवळ २० टक्के रक्कम देत होते. मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे त्यांना काही कर्ज झाले होते. व्यवसायासाठी त्यांनी विविध बँकेसह अर्थपुरवठा करणार्या खाजगी कंपन्यांकडून सुमारे ६१ लाख रुपये घेतले होते. त्यापैकी तीस लाखांच्या कर्जाची त्यांनी परतफेड केली होती, मात्र उर्वरित कर्जाचे हप्ते भरताना त्यांना बर्याच अडचणी येत होत्या.
आणखी वाचा-एसटीची राज्यभरातील सेवा विस्कळीत, एसटी संघटनेची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक
नेहमीप्रमाणे ३१ मे २०२४ रोजी ते कांदिवलीतील कार्यालयात गेले होते. दुपारच्या जेवणासाठी नरेंद्र घरी आले नाही म्हणून त्यांच्या पत्नी ममताने त्यांना दूरध्वनी केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. जवळपास २५ ते ३० वेळा दूरध्वनी करूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने ममता प्रचंड घाबरल्या. त्यामुळे कांदिवलीतील कार्यालयात जाऊन त्यांनी चौकशी केली असता नरेंद्र यांनी तेथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. नरेंद्र यांच्या आत्महत्येनंतर सोनकर कुटुंबिय त्यांच्या उत्तर प्रदेशातील फतेहपूर, हुसेनगंज येथील गावी निघून गेले होते. याचदरम्यान नरेंद्रचा मित्र शकील याने ममता यांना एक व्हिडीओ पाठविला होता. हा व्हिडीओ त्यांच्या पतीचा होता.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने तो व्हिडीओ बनविला होता. त्यात त्यांनी चिराग आणि केतन सावला बंधूंकडून त्यांना व्यवहारातील २५ लाख रुपये येणे बाकी असल्याचे, तसेच वारंवार पैशांची मागणी करूनही ते पैसे देत नसल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करीत असल्याचे म्हटल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या आत्महत्येला ते दोघेच जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यानंतर ममता सोनकर यांनी कांदिवली पोलिसांना ही चित्रफीत दाखवून चिराग आणि केतन सावला या दोघांविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर सावला बंधूविरूद्ध पोलिसांनी नरेंद्रला आत्महत्येस प्रवृत्त करणे, शिवीगाळ करुन धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.