scorecardresearch

वैद्यकीय प्रवेशासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले संशयास्पद

११९ पैकी फक्त ११ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत

वैद्यकीय प्रवेशासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले संशयास्पद
(संग्रहित छायाचित्र)

केवळ ११ विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रे प्राप्त

राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश दिलेल्या ११९ पैकी फक्त ११ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत. त्यानुसार त्यांच्या प्रवेशातील अडथळा दूर झाला आहे. उर्वरित १०८ विद्यार्थ्यांच्या जातीच्या दाखल्याबद्दल संशय असून, उच्च न्यायालयाच्या निर्णयावर या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून राहणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत (नीट) पात्र ठरलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवरील प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले होते. परंतु जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या हमीपत्रावर त्यांना प्रवेश द्यावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या हमीपत्रावर दिलेले अनुसूचित जमातीबरोबरच अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करावेत, असा राज्य सरकारला आदेश दिला. त्यानुसार मागास वर्गातील ३५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची सीईटी सेलने नोटीस काढली होती.

राज्य सरकारच्या विनंतीनुसार सर्वोच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन आठवडय़ांची मुदत दिली.त्यात सामाजिक न्याय विभागाशी संबंधित अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रे मिळाली. मात्र  अनुसूचित जमातीच्या ११९ पैकी फक्त ११ विद्यार्थ्यांनाच ही प्रमाणपत्रे प्राप्त झाली.  ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणी समित्यांच्या निर्णयासंदर्भात १२ सप्टेंबपर्यंत उच्च न्यायालयात दाद मागत ऑक्टोबर अखेपर्यंत उच्च न्यायालयाने या प्रकरणावर अंतिम निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने  म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-09-2017 at 03:27 IST

संबंधित बातम्या