scorecardresearch

ताडदेव इमारतीच्या आगीचे कारण स्पष्ट नाही

गेल्या महिन्यात २२ जानेवारी रोजी पहाटे ताडदेव येथील ‘सचिनम हाईटस’ या इमारतीला आग लागली होती.

(संग्रहित छायाचित्र)

अग्निरोधक यंत्रणेबाबत निष्काळजीपणा; चौकशी अहवालातील निष्कर्ष

मुंबई :  ग्रॅन्टरोड येथील ‘सचिनम हाईटस’ या इमारतीला जानेवारी महिन्यात लागलेल्या आगीचा अहवाल चौकशी समितीने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे सादर केला आहे. तब्बल एक महिन्यानंतर हा अहवाल सादर करण्यात आला असून आग नक्की कशामुळे लागली याचे कारण अज्ञात असल्याचे यात म्हटले आहे. अग्निरोधक यंत्रणेतील त्रुटींबाबत इमारतींच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचेही या अहवालात प्रस्तावित आहे.  

गेल्या महिन्यात २२ जानेवारी रोजी पहाटे ताडदेव येथील ‘सचिनम हाईटस’ या इमारतीला आग लागली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या आगीत इमारतीची विद्युत यंत्रणा पूर्ण जळून गेल्यामुळे अद्यापही इमारतीत रहिवाशांना प्रवेश देण्यात आलेला नाही. या आगीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र तब्बल महिन्याभराने हा अहवाल सादर करण्यात आला आहे. इमारतीचे पदाधिकारीही या दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्यामुळे या अहवालात कोणावर कार्यवाहीची शिफारस करणार याबाबत उत्सुकता होती. समितीने या अहवालात पुढील कार्यवाहीबरोबरच भविष्यात अशा दुर्घटना घडू नये म्हणून

दूरगामी उपाययोजना सुचविल्या आहेत.

आगीच्या या घटनेची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी पालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.

या समितीमध्ये डी विभागाचे सहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत), उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) (शहर), उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांचाही समावेश होता. आग लागल्याचे नेमके कारण, आग पसरून सहा नागरिकांचा मृत्यू होण्यामागील कारण आणि सदर इमारतीच्या मंजूर आराखडय़ामध्ये कोणतेही विनापरवानगी बदल करण्यात आले असल्यास त्याची शहानिशा करणे या अनुषंगाने समितीने अभ्यास केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cause of fire in tardeo highrise building is not clear zws

ताज्या बातम्या