मुंबई : काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर व त्यांच्या चालकाच्या २० वर्षांपूर्वी झालेल्या हत्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (८६) यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाला प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, सीबीआयच्या आधी निंबाळकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.
सीबीआयने पाटील आणि अन्य आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक व सबळ पुरावेच सादर केले नाहीत. हा खटला मुख्यत्त्वे माफीचा साक्षीदार झालेल्या आरोपीच्या कबुलीजबाबावर आधारित होता. परंतु, त्याचा कबुलीजबाब दबावाखाली घेतल्याचे आणि त्याने सतत कबुलीजबाब बदल्याने त्यात मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आल्या आहेत, असे निरीक्षण नोंदवून पाटील यांच्यासह सर्व आरोपींना संशयाचा फायदा देऊन विशेष न्यायालयाने त्यांच्या निर्दोष सुटकेचा निकाल दिला होता. या निकालाविरोधात अखेर सीबीआयने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. तसेच, हा निकाल कायद्याच्या चौकटीत चुकीचा असून तो रद्द करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सीबीआयच्या अपिलावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
पाटील आणि पवनराजे हे राजकीय प्रतिस्पर्धी होते हे सिद्ध झाले आहे, त्यांनी एकमेकांविरुद्ध विविध तक्रारी आणि प्रति-तक्रारी दाखल केल्या होत्या. असे असले तरी पाटील हे या हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार होते हे सिद्ध करण्यात सीबीआय अपयशी ठरली आहे, अशी टिप्पणी करून विशेष न्यायालयाने तपास यंत्रणाने सादर केलेला बहुतांश पुरावा अमान्य केला होता. माफीचा साक्षीदार झालेल्या पारसमल जैन याची साक्ष खटल्यात महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती. परंतु, ताब्यात घेतल्यानंतर जैन याला १५ दिवस बेकायदेशीर कोठडीत ठेवण्यात आले होते आणि त्यांचा छळ करण्यात आला होता. त्यामुळे, ती संशयास्पद असून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले होते. दरम्यान, निकालानंतर, प्रकरणातील मूळ तक्रारदार आणि शिवसेनेचे धाराशिव येथील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आई आनंदीदेवी यांनी पाटील यांच्या निर्दोष सुटकेविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेऊन अपील दाखल केले होते. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने या अपिलाची दखल घेऊन पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपींना नोटीस बजावून अपिलावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते.
