मुंबई : परदेशातील नोकरीचे आमीष दाखवून तरुणांना गुन्हेगारी कारवायांच्या जगतात जबरदस्तीने पाठविणाऱ्या टोळ्यांचा शोध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरु केला आहे. त्यातील प्रमुख सूत्रधाराला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आल्यानंतर या मानवी तस्करीतील महत्त्वाचे दुवे सीबीआयच्या हाती लागले आहेत. अशा पद्धतीने परदेशात मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करी होत असून सायबर फसवणूक, आर्थिक गैरव्यवहारांमध्ये या तरुणांना अडकवले जात आहे. यापैकी काही तरुणांवर परदेशातही गुन्हे दाखल झाले असण्याची शक्यता सीबीआयमधील सूत्रांनी वर्तविली.

बॅंकॅाकमध्ये गलेलठ्ठ पगाराचे आमीष दाखवून संबंधितांची म्यानमारमधील सायबर फसवणुकीच्या केंद्रात भरती केल्याचे प्रकरण अलीकडेच सीबीआयने उघड केले आहे. या केंद्रात अडकलेले काही तरुण तेथून पळून बॅंकॅाकमार्गे भारतात परतल्याने त्यांच्या जबाबातून हा गंभीर प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सीबीआयने या तस्करांच्या देशातील हस्तकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. या चौकशीतून अशा मानवी तस्करीची मोठी साखळी असल्याचे उघड झाले आहे. या साखळीचा प्रमुख सूत्रधार असलेला सुनील नेलाथू रामकृष्णन ऊर्फ क्रीश याला मुंबईत विमानतळावरुन अटक केली. तो मुंबईत येणार असल्याच्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या तस्करीतील काही दलाल तसेच हस्तकांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

म्यानमार येथील मायावड्डी (केके पार्क) परिसरात जगभरात सायबर फसवणुकीद्वारे अनेकांना गंडा घालणारी मोठी केंद्रे अस्तित्त्वात आहेत. या केंद्रात भारतातील तसेच इतर आशियाई देशांतील बेरोजगार तरुणांची नोकरीचे निमित्त दाखवून भरती केली जात आहे. सुरुवातीला थायलंड येथे नोकरी उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. नोकरीबाबतची कागदपत्रेही सादर केली जातात. मात्र संबंधित व्यक्ती बॅंकॅाक येथे पोहोचल्यानंतर त्याची रवानगी म्यानमार येथे खोटे कारण सांगून केली जाते.

प्रामुख्याने दिल्ली येथून या इच्छुकांना बॅंकॅाक येथे नेले जाते व मग त्यांना जबरदस्तीने म्यानमारमधील तस्करांकडे सुपूर्द केले जाते. या मोबदल्यात एजंटांना मोठी रक्कम मिळते. संबंधितांना सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांत अडकवले जाते. त्यांचा पासपोर्ट काढून घेण्यात आल्यामुळे तेथे नाईलाजाने त्यांना ते करावे लागते. या कॅाल सेंटर्समध्ये फक्त विविध प्रकारच्या घोटाळ्यांमध्ये विविध देशांतील नागरिकांना अडकविण्याचे काम दिले जाते. त्यासाठी त्यांना सूचनाही दिल्या जातात. तसेच कमीशनचेही आमीष दाखविले जाते. आपण फसले गेले असल्याचे कळूनही परतीचे दोर कापल्याचे त्यांना आढळून येते. अशातही काही तरुणांनी हिंमत दाखविल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. आता सीबीआयने परदेशात भरती करणाऱ्या सर्वत संस्थांची कुंडली तपासण्यास सुरुवात केली आहे.

मार्च आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये संबंधित तरुणांकडून सीबीआयने माहिती घेऊन या संपूर्ण घोटाळ्याची कार्यपद्धती जाणून घेतली. त्यानंतर कसून केलेल्या चौकशीत व गोपनीय माहितीद्वारे या तस्करीतील आरोपांचा शोध घ्यायला सुरुवात केली. सुनील ऊर्फ क्रिश याचे नाव समजल्यानंतर त्याच्या हालचालींवर सीबीआयने नजर ठेवली होती. मुंबईत येताच त्याला ताब्यात घेतल्यामुळे आता या तस्करीतील अनेकांचा सहभाग उघड होण्याची शक्यता आहे. क्रीश याच्या निवासस्थानी व कार्यालयात टाकलेल्या छाप्यात अशा अनेक तरुणांना आमीष दाखवून म्यान्मारसह कंबोडिया येथे पाठविण्याची योजना होती. कंबोडिया येथेही अशी कॅाल सेंटर्स मोठ्या प्रमाणात असल्याची माहितीही उघड झाली आहे. या तस्करीत काही परदेशी नागरिकांचा सहभाग असून त्यांची नावेही सीबीआयला मिळाली आहेत.

नोकरीनिमित्ताने परदेशात जाताना अनधिकृत एजंटांची मदत न घेण्याचे आवाहन सीबीआयने केले आहे. यामुळे मानवी तस्करी होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सीबीआयने केले आहे.