मुंबई : तुम्हाला मोबाइलवर सायबर फसवणुकीच्या दृष्टीने छळणारे अनेक काॅल्स येतात वा कर्जवसुलीसाठी येणाऱ्या कॅालवरून तुम्हाला प्रचंड त्रास दिला जातो. पोलिसांकडे तक्रारीची धमकी दिली तरी बिनधास्त करा, असे समोरचा उद्धटपणे ऐकवतो. कारण त्याचा ठावठिकाणा शोधला जाणार नाही याची त्याला खात्री असते. अशीच यंत्रणा केंद्रीय गुप्तचर विभागाने गेली काही दिवस सुरू केलेल्या ‘ॲापरेशन चक्र’ या मोहिमेमुळे उघड झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशातील वाढत्या सायबर फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी सीबीआयने आखलेल्या या मोहिमेत पुणे व अहमदाबाद येथे २०१४ पासून सुरू असलेल्या दोन कॅाल सेंटर्सवर कारवाई केली आहे. या कॅाल सेंटर्समधून अमेरिकेतील अनेक ग्राहकांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ॲाफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) इंटरपोलमार्फत सीबीआयकडे तांत्रिक माहिती पुरविली होती. व्हॅाईस ओवर इंटरनेट प्रोटोकॅाल या तंत्रज्ञानाचा वापर या कॅाल सेंटरमध्ये वापरली जात होती. त्यामुळे कॅाल करणाऱ्याचा शोध घेणे कठीण होते. अमेरिकेतील उच्चशिक्षित ग्राहकांना फसविले गेले तर मग भारतातील किती जणांना गंडा घातला गेला असेल याची कल्पनाच केलेली बरी, याकडे एका सीबीआय अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

हेही वाचा >>> मराठी नामफलक नसलेल्या दुकानांविरुद्ध कारवाईला मुहूर्त मिळेना ; महानगरपालिकेचा कारवाईचा आराखडा तयार, पण आयुक्तांच्या मंजुरीची प्रतीक्षा

सायबरविषयक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सीबीआयचा विशेष तपास विभाग आहे. एफबीआय, इंटरपोल तसेच कॅनडा व ॲास्ट्रेलियातील तपास यंत्रणेकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीची गेल्या काही महिन्यांपासून शहानिशा सुरू होती. त्यातूनच ही माहिती उघड झाली आहे.

सीबीआयने या माहितीच्या आधारे देशभरात सुरू असलेल्या अनेक संशयास्पद कॅाल सेंटर्सवर छापे टाकले. १६ राज्यात एकाच वेळी सीबीआयने ही कारवाई केली. सायबर फसवणुकीला प्रतिबंध बसावा, यासाठी ही मोहीम फायदेशीर ठरेल, असा दावाही सीबीआयमधील सूत्रांनी केला आहे.  

ठाणे पोलिसांचीही कारवाई

सीबीआयने ही कारवाई आता केली असली तरी ठाणे पोलिसांनीही दोन वर्षांपूर्वी वागळे इस्टेटमधील दोन कॅाल सेंटर्स उद्ध्वस्त केली होती. अमेरिकेतील एक एजंट त्यांना मदत करीत असल्याचे तेव्हा तपासात उघड झाले होते. अमेरिकन बॅंकांतून दिले जाणाऱ्या पतसुविधेची रक्कम परस्पर काढून ती एजंटमार्फत हवालाद्वारे मिळविली जात होती. अमेरिकन नागरिकांचा तपशील संबंधित एजंटकडून मिळविण्यात आला होता. अमेरिकन नागरिकांना त्यांच्या ओळख क्रमांकावरून बॅंकेचा तपशील मिळविण्यात या कॅाल सेंटरमधील तरुणांचा हातखंडा होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi launched operation chakra against cyber crime and financial fraud mumbai print news zws
First published on: 06-10-2022 at 15:20 IST