अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी न्यायायलात आरोपपत्र दाखल करण्यात आले. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रात वीरेंद्र तावडे याचा याचा मुख्य आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्यावरही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात वीरेंद्र तावडे याने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा संपूर्ण कट आखल्याचे म्हटले आहे. तसेच मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या बाईकवरील व्यक्ती सारंग अकोलकर आणि विनय पवार असल्याचे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. वीरेंद्र तावडे याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याने पोलिसांनी रात्री दोन वेळा मारहाण केल्याची तक्रार न्यायालयाकडे केली. पोलिसांनी दोन वेळा पाठ, पोट, गुडघा आणि डोक्यावर मारहाण केल्याची तावडेने म्हटले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा शल्यचिकित्सकाद्वारे त्याची तपासणी केली असता त्याला मारहाण झाली नसल्याचे रात्री स्पष्ट झाले होते. पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांच्या हत्या एकाच विचारातून घडल्या आहेत. त्यात तावडे याची भूमिका मोठी असून, त्याचा तपास राज्यात व परराज्यात करावा लागणार असून, त्यासाठी १४ दिवस पोलीस कोठडीची मागणी त्यांनी केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन वर्ष उलटूनही त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे सरकार आणि पोलीस यंत्रणेला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात बोलताना भारिप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे खरे मारेकरी शोधायचेच नाहीत, अशी टीका केली होती.