मुंबईतील बहुचर्चित दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी दोन दिवसांपूर्वी सीबीआयकडे आपला जबाब नोंदवला होता. त्यानंतर, आरोपींना लवकर अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानुसार, सीबीआयने सतीश सालियान यांच्या जबाबावर दिशाच्या मृत्यूप्रकरणात अखेर गुन्हा दाखल करत एफआयआर नोंदवला आहे. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आहे असं वृत्त PTI या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा काय म्हणाले?
१२ सप्टेंबरला दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयने नोंदवला होता. ही प्रक्रिया चार तास चालली. त्यानंतर FIR दाखल करण्यात आला. या मध्ये सामूहिक बलात्कार, हत्या आणि हे लपवणारे पोलीस अधिकारी या प्रकरणात दाखल केला आहे. ३७६, ३०२ ही कलमं यात आहेत. या FIR मध्ये मुख्य आरोपी म्हणून सूरज पांचोली, आदित्य ठाकरे ही नावं आहेत. दिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची नावं आहेत. तसंच कटात जे लोक सहभागी आहेत त्यात रिया चक्रवर्ती, परमबीर सिंग, रोहन रॉय, सचिन वाझे, इमारतीचे सुरक्षा रक्षकांची नावं आहेत. डॉक्टर संजय यादव आहेत, अशी मोठी यादी आहे असं निलेश ओझा यांनी पीटीआयला सांगितलं.
आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशाकडे पुरावे होते-निलेश ओझा
निलेश ओझा पुढे म्हणाले, आदित्य ठाकरेंबाबत काही गोष्टी दिशा सालियनला माहीत होत्या. ड्रग्ज वगैरे बाबत तिच्याकडे पुरावे होते. सुशांत सिंग राजपूतला तिने ते पुरावे शेअर केले होते. सुशांतने ही बाब रिया चक्रवर्तीला सांगितली होती. रिया चक्रवर्तीने आदित्य ठाकरेंना ही बाब सांगितली. डिनो मोरिया, रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे हे पार्टनर इन क्राईम आहेत हे सुशांत सिंग राजपूतला माहीत नव्हतं. त्यानंतर सगळा कट रचला गेला. सचिन वाझेला आणलं गेलं. जी FIR दाखल झाली आहे त्यात एक नाही अनेक हत्यांचा उल्लेख आहे असंही निलेश ओझा यांनी पीटीआयला सांगितलं.
८ जून २०२० ला दिशा सालियनचा मृत्यू
८ जून २०२० ला दिशा सालियनचा मालाड येथील राहत्या घरातून पडून मृत्यू झाला होता. दिशाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसह तिने काही काळ काम केलं होतं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सविस्तर तपास करत दिशाने आत्महत्या केल्याचा दावा केला होता. मार्च २०२५ मध्ये देशाचे वडील सतीश सालियन यांनी दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दिशाचे वडील भावूक झाले होते.
