मुंबई: येस बँक, डीएचएफएल फसवणूक प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणी शनिवारी शोधमोहीम राबवली. पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले आणि मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक विनोद गोएंका आणि शाहिद बलवा यांच्यासह आणखी दोन व्यावसायिकांशी संबंधित ठिकाणांवर ही शोधमोहीम राबवण्यात आल्याचे सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले. सीबीआयने याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक संजय छाबरिया यांना अटक केली होती. छाबरिया ६ मेपर्यंत सीबीआय कोठडीत आहेत. त्याप्रकरणी ही शोधमोहीम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

छाबरिया हे रेडिअस समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. डीएचएफएलमधून त्यांनी मोठे कर्ज घेतले होते. त्यातील तीन हजार कोटी रुपये थकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मार्च २०२० मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. फेब्रुवारीमध्ये सीबीआयने छाबरियाची चौकशी केली होती. सीबीआयने गेल्या वर्षी दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रानुसार, जून २०१८ मध्ये, येस बँकेच्या कर्ज व्यवस्थापन समितीने धीरज वाधवन आणि त्यांचा भाऊ कपिल यांच्या अर्जावर, वांद्रे येथील पुनर्वसन प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. येस बँक लिमिटेडने बिलिफ रिअलटर्स प्रायव्हेट लिमिटेड (बीआरपीएल) ला दिलेले ७५० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याच्या अनुषंगाने, डीएचएफएलच्या खात्यांमध्ये ६३२ कोटी रुपयांची रक्कम या बीआरपीएलने वळती केली होती.

या रकमेचा काही भाग त्यानंतर डीएचएफएलद्वारे २८ सप्टेंबर २०१८ ला फ्लॅग इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि छाब्रिया यांच्या मालकीच्या इतर कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे सीबीआयने छाब्रिया यांची कोठडीची मागणी करताना ही माहिती न्यायालयाला दिली होती. या कर्जाचे एकूण तीन हजार ९४ कोटी रुपये कोणाकडे गेले हे तपासण्यासाठी सीबीआयने छाब्रिया यांच्या कोठडीची मागणी केली होती.