काळा पैसा रोखण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला असला तरी सर्वच क्षेत्रात, विशेषत: रियल इस्टेट क्षेत्रात काळ्या पैशाचा मुक्त संचार सुरू असून त्यामुळे कॉर्पोरेट दलालांचे प्रस्थही दिवसेंदिवस वाढत असल्याची बाब पुढे आली आहे. अशा काही कॉर्पोरेट दलालांवर सध्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग लक्ष ठेवून आहे. या दलालांच्या कार्यपद्धतीमुळे बडय़ा कंपन्यांचे काही अतिवरिष्ठ अधिकारी अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
‘सीबीआय’मधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिअल इस्टेट क्षेत्रात बडय़ा कॉर्पोरेट कंपन्यांचा शिरकाव झाल्यानंतर दलालांची चलती सुरू झाली. एम्मार एमजीएफ या कंपनीच्या कथित भूखंड घोटाळ्याची चौकशी करताना यापैकी काही कॉर्पोरेट दलालांची नावे अधोरेखित झाली आहेत. त्यानुसार या दलालांवर सीबीआयने पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. याबाबत सीबीआयकडून अधिकृतपणे काहीही सांगितले जात नसले तरी याबाबत लवकरच एक मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
सीबीआयकडून अगदी प्राथमिक स्वरूपात सुरू असलेल्या चौकशीतून जुहूतील दोघा कॉर्पोरेट दलालांची नावे पुढे आली आहेत. त्यापैकी एकाचे ‘दुबई कनेक्शन’ही उघड झाले आहे. कॉर्पोरेट कंपन्यांकडे असलेला काळा पैसा पांढरा करता करता यापैकी एक दलाल  अवघ्या काही वर्षांतच करोडपती झाला आहे. अगदी सडकछाप असलेला हा दलाल अल्प कालावधीतच ‘कॉर्पोरेट’ दलाल म्हणून वावरू लागण्यामागे एका बडय़ा कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी असलेल्या संबंधांची माहिती उघड झाली आहे. अजमेरा नावाच्या आणखी एका कॉर्पोरेट दलालाची सध्या चर्चा सुरू असून एका बडय़ा कंपनीचा कोटय़वधी
अर्थपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात विकासकाकडून प्रचंड दलाली मागण्यात आली होती. दलाली देण्यापेक्षा अर्थपुरवठा नको, असे म्हणण्याची पाळी या विकासकावर आली. त्यावेळी संबंधित कॉर्पोरेट कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यापर्यंत दलाली पोहचवावी लागते, असे उत्तर या दलालाने दिल्याचे  सूत्रांनी सांगितले.