मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावी गणित प्रश्नपत्रिकेवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तो थेट गाण्याच्या व्हिडिओकडे वळत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते. मात्र संबंधित क्यूआर कोड हा केवळ अंतर्गत वापरासाठी असून, त्यामध्ये कोणताही सार्वजनिक दुवा दिलेला नाही, असे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच क्यूआर स्कॅन केल्यानंतर दिसणारी हायपरलिंक हा वापरकर्त्याच्या इंटरनेट सवयी, ब्राउझिंग इतिहास, वापरलेले अॅप आणि डिव्हाइस सेटिंग्ज यावर अवलंबून बदलू शकतो, असेही मंडळाने स्पष्ट केले.

सीबीएसईचा ९ मार्च रोजी गणिताचा पेपर झाला. यावेळी प्रश्न पत्रिकेवर दिलेला क्यूआर कोड काही विद्यार्थ्यांनी स्कॅन केला असता थेट प्रसिद्ध गायक रिकी ॲस्टले याचे ‘नेव्हर गॉना गिव्ह यू अप’ हे गाणे मोबाइलवर दिसत असल्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला होता. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, प्रश्नपत्रिकेची सुरक्षितता आणि विश्वासार्हता यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर सीबीएसईकडून स्पष्टीकरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिकांवर छापलेले क्यूआर कोड हे परीक्षा व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स ट्रॅकिंग, प्रश्नपत्रिका संचांची ओळख आणि पडताळणी यासाठी वापरले जातात. हे कोड सार्वजनिक वापरासाठी नसून, विशिष्ट अधिकृत प्रणाली आणि अधिकृत अॅप्सद्वारेच त्यांचा योग्य अर्थ लावला जातो. सर्वसाधारण मोबाइल अॅपद्वारे स्कॅन केल्यास त्या कोडमधील तांत्रिक माहिती योग्य प्रकारे वाचली जात नाही.

त्यामुळे काही प्रकरणांमध्ये मोबाइलवरील ब्राउझर किंवा स्कॅनर अॅप स्वतःच्या अल्गोरिदमनुसार एखादा ‘संबंधित’ किंवा ‘सुचवलेला’ दुवा उघडू शकतो. हा दुवा वापरकर्त्याच्या आधीच्या सर्च हिस्ट्री, पाहिलेल्या व्हिडिओ, लोकेशन किंवा इतर डिजिटल सवयींशी संबंधित असू शकतो. त्यामुळेच काही विद्यार्थ्यांना गाण्याचा व्हिडिओ दिसला, तर इतरांना वेगवेगळे दुवे दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मंडळाने नमूद केले.

सीबीएसईने यासंदर्भात शाळा आणि परीक्षा केंद्रांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. प्रश्नपत्रिकेवरील क्यूआर कोड स्कॅन करणे टाळावे, तसेच विद्यार्थ्यांनाही याबाबत जागरूक करावे, असे सांगण्यात आले आहे. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणताही व्यत्यय आलेला नाही किंवा प्रश्नपत्रिकेची गोपनीयता भंग झालेली नाही, असेही मंडळाने ठामपणे स्पष्ट केले.