मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांना मुख्य विषयात अनुत्तीर्ण झाल्यास कौशल्य शिक्षण विषयाचा पर्याय उत्तीर्णतेसाठी मिळणार आहे. यंदा नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षेची रचना स्पष्ट केली. त्यानुसार २०२८ मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच अनिवार्य विषयांसोबत कौशल्याधारित सहावा विषय निवडण्याची संधी मिळणार आहे. मुख्य विषयांपैकी एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाल्यास कौशल्य विषयाच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, त्यासाठी मंडळाच्या लागू असलेल्या निकालविषयक नियमांची पूर्तता करावी लागेल.
व्यवसाय शिक्षण आणि कौशल्य शिक्षण असे दोन विषय गट असल्यामुळे झालेल्या नव्या योजनेनुसार, विद्यार्थ्यांना एकूण नऊ अनिवार्य अभ्यास विषय शिकावे लागतील. त्यात दोन भाषा, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या पाच विषयांची मंडळाची परीक्षा होईल. याशिवाय तिसरी भाषा, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व स्वास्थ्य आणि व्यावसायिक शिक्षण या विषयांचाही समावेश असेल. व्यावसायिक शिक्षण हा अनिवार्य विषय कायम ठेवण्यात आला आहे.
त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘कौशल विकास’ किंवा मंडळाने अधिसूचित केलेल्या २२ कौशल्याधारित विषयांपैकी एका विषयाची निवड करता येईल. कृत्रिम प्रज्ञा, माहिती तंत्रज्ञान, माहिती विश्लेषण, वित्तीय बाजारपेठ, आरोग्यसेवा आणि डिझाइन थिंकिंग अशा विषयांचा या पर्यायांत समावेश आहे. कौशल्याधारित विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विषयाची दहावीची बोर्ड परीक्षा द्यावी लागेल. मुख्य विषयात अनुत्तीर्ण आणि कौशल्याधारित शिक्षण विषयांत उत्तीर्ण झाल्यासही विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होईल.
अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचे वेळापत्रक लक्षात घेऊन ‘इंडिव्हिज्युअल्स इन सोसायटी’ हा नववीचा विषय, तसेच कृत्रिम प्रज्ञा आणि संगणकीय विचारप्रक्रियेशी संबंधित घटक वगळण्यात आले आहेत. याशिवाय, २०२७-२८ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पर्यावरण शिक्षण’ हा विषयही अभ्यासक्रमाचा भाग नसेल. विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी शैक्षणिक आणि परीक्षा व्यवस्थेतील तरतुदी आधीच स्पष्ट करणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
काय होणार
– तीन भाषा विषयांतील दोन भाषा विषयांत उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थी एकूण परीक्षेत उत्तीर्ण होईल
– गणित, विज्ञान, समाजशास्त्र यातील एखाद्या विषयांत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास आणि मंडळाने परीक्षा घेतलेल्या कौशल्याधारित विषयांत उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थी उत्तीर्ण ठरले.
व्यवसाय शिक्षण आणि कौशल्याधारित शिक्षणाचा गोंधळ
मंडळाने यापूर्वीच व्यावसाय शिक्षण विषय लागू केले आहेत. यंदापासून कौशल्याधारित विषयही लागू करण्यात आले आहेत. त्याची परीक्षा मंडळ घेणार आहे. ते विषय उत्तीर्णतेसाठी मुख्य विषयाला पर्याय ठरतील. व्यवसाय शिक्षण विषयांची परीक्षा शालेय स्तरावर होईल. त्याचा उत्तीर्णतेसाठी मुख्य विषयाला पर्याय म्हणून विचार केला जाणार नाही.
