मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टू बोर्ड परीक्षा’ धोरण लागू केले आहे. त्यानुसार यंदा दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी मिळावी यासाठी अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा मे महिन्यामध्ये होणार असून, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्याचे निर्देश सीबीएसई मंडळाने सर्व संलग्न शाळांना दिले आहेत.

पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेमध्ये कमाल तीन विषयांमध्ये गुण सुधारण्याची संधी ‘टू बोर्ड परीक्षा’ धोरणामुळे उपलब्ध होणार आहे. सीबीएसईकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया वेळेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार ‘विद्यार्थ्यांची यादी’ (एलओसी) सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. ही यादी तीन टप्प्यांमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांची नावे ३१ मार्चपर्यंत मंडळाकडे सादर करणे बंधनकारक आहे. पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्याची प्रक्रिया १८ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. शाळांनी १८ ते ३१ मार्च या कालावधीत इच्छुक विद्यार्थ्यांची नावे, विषयांची निवड आणि आवश्यक वैयक्तिक तपशील ऑनलाईन प्रणालीमध्ये नोंदवणे अपेक्षित आहे. यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी माहिती सादर करताना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर सादर केलेल्या माहितीची पडताळणी, शुल्क भरणे आणि अंतिम यादी निश्चित करणे या प्रक्रिया पार पडणार आहेत. त्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षा शुल्क भरून विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी दुसरा टप्पा रावबिण्यात येणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील पाच दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. तर नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये विलंब शुल्कासह पुढील दोन दिवस संधी देण्यात येणार आहे. निर्धारित मुदतीनंतर माहिती सादर केल्यास ती स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्ट करत मंडळाने शाळांना वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

जवळचे परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता कमी

परीक्षा केंद्रांची संख्या मर्यादित असल्यामुळे विद्यार्थ्यांना जवळचे केंद्र मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे एकदा केंद्र निश्चित झाल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही, असे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शक्यतो विद्यार्थांकडून पहिल्या टप्प्यातच अर्ज नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून परीक्षेची तयारी योग्य प्रकारे करता येईल. निकालानंतर निर्णय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात अर्ज व शुल्क भरता येणार आहे.