मुंबई : मध्य पूर्वेकडील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण आणि युद्धजन्य स्थितीमुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य पूर्वेकडील बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांमधील सीबीएसई मंडळाच्या शाळांमध्ये ९, १० आणि ११ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
मध्य पूर्वेकडील बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांमध्ये सीबीएसई मंडळाशी संलग्न अनेक शाळा आहेत. या देशातील भारतीय या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतात. सध्या अमेरिका – इस्रायल – इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मध्य पूर्वेकडील या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
युद्धजन्य स्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सीबीएसईने ९ मार्च, १० मार्च आणि ११ मार्च या तीन दिवशी होणाऱ्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील सूचना या देशातील संलग्न शाळांना मंडळकडून देण्यात आल्या आहेत. तसेच १० मार्च रोजी परिस्थितीचा आढावा घेऊन १२ मार्चनंतर होणाऱ्या परीक्षांबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांशी नियमित संपर्कात राहण्याचे आणि अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन सीबीएसई मंडळाने केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला आणि शैक्षणिक हिताला प्राधान्य देत परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
