मुंबई : सीबीएसई मंडळाने ३० एप्रिल रोजी निकाल जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सीबीएसई मंडळाच्या बारावीच्या निकालाबाबत अनेक अफवा पसरल्या जात होत्या. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते. अखेर १३ मे रोजी दुपारी सीबीएसई मंहळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. सीबीएसई बारावी निकाल ८५.२० टक्के इतका लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत ३.१९ टक्क्यांनी निकाल घसरला आहे.
भारतासह जगातील २७ देशांमध्ये सीबीएसई मंडळाशी संलग्न शाळा आहेत. या सर्व देशांमध्ये मिळून मंडळाशी संलग्न १९ हजार ९६७ शाळा आहेत. या शाळांमधून यंदा १७ लाख ८० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १७ लाख ६८ हजार ९६८ विद्यार्थी परीक्षेला बसले, परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १५ लाख ०७ हजार १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचे हे प्रमाण ८५.२० टक्के इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सीबीएसईच्या निकालामध्ये ३.१९ टक्क्यांनी घट झाली आहे. जगभरामध्ये ७ हजार ५७३ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. तर बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी १२० विषय उपलब्ध करून देण्यात आले होते.
निकाल कोठे पाहता येणार
https://www.cbse.gov.in/
http://www.results.nic.in/
https://results.digilocker.gov.in/
https://umang.gov.in
या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. तसेच गुणपत्रिका तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रे ‘डिजीलॉकर’मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
मोबाईल ॲपद्वारेही निकाल उपलब्ध
सीबीएसईने दिलेल्या संकेतस्थळांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना मोबाईल ॲपवरही निकाल पाहता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांन डिजीलॉकर आणि उमंग या माेबाईल ॲपचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ठिकाणांवरून हे ॲप डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
‘ऑन स्क्रीन मार्किंग’मुळे मूल्यमापनात क्रांती
इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यासाठी यंदा सीबीएसई मंडळाने ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीचा वापर केला होता. या प्रणालीद्वारे भारतासह सर्वच देशातील विद्यार्थ्यांच्या तब्बल ९८ लाख ६६ हजार ६२२ उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यात आले. यामुळे देशातील कोणत्याही भागातून उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन करणे शक्य झाले. तसेच मानवी चुका टाळल्या गेल्याने अचूकतेत वाढ झाली आहे. प्रत्येक उत्तराचे मूल्यमापन निर्धारित गुणयोजनेनुसार होत असल्याने विद्यार्थ्यांना न्याय्य निकाल मिळण्यास मदत झाल्याचे बोर्डाने नमूद केले.
