‘एनसीईआरटी’ने तयार केलेल्या पाठय़पुस्तकांऐवजी महागडी सराव पुस्तके, प्रश्नसंच खरेदी करण्याचा शाळांचा आग्रह

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये खासगी प्रकाशकांच्या पुस्तकांची सक्ती केली जात असून पाठय़पुस्तकांबरोबरच सराव पुस्तके, प्रश्नसंच घेण्यास पालकांना भाग पाडले जात आहे. त्यामुळे पालकांच्या खिशावरील आणि विद्यार्थ्यांच्या दप्तरातील ओझे मात्र वाढले आहे.

सीबीएसईच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) पुस्तके तयार केलेली असतानाही शाळा मात्र खासगी प्रकाशकांची पुस्तके वापरण्याची सक्ती करत आहेत. विशिष्ट प्रकाशकांचीच पुस्तके वापरण्याच्या सक्तीमुळे पालकांना भरुदड सहन करावा लागत आहे. परिषदेने तयार केलेली पुस्तकेच वापरणे बंधनकारक करण्यात यावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र गेल्यावर्षी केंद्रीय मंडळाने काढलेल्या परिपत्रकामध्ये खासगी पुस्तकांतील मजकूर अभ्यासक्रमाशी सुसंगत असल्याची खातरजमा करून खासगी पुस्तके वापरण्यास हरकत नाही, असे मंडळाने नमूद केले. त्यामुळे शाळांना खासगी प्रकाशकांची पुस्तके वापरण्याची मुभा मिळाली. आता यंदाही खासगी शाळांमध्ये खासगी पुस्तकेच घेण्याची सक्ती शाळा करत आहेत. नियमित विषयांबरोबरच प्रश्नसंच, सरावपुस्तके, प्रात्यक्षिकांची पुस्तके, प्रकल्पांची पुस्तके अशी मोठी यादीच पालकांच्या हाती मिळते. त्यामुळे पालकांच्या खिशावरील आणि मुलांच्या पाठीवरील ओझे अजूनही घटलेले नाही.

खासगी प्रकाशकांची पुस्तके अधिक तपशिलात असतात. त्यांची भाषा सोपी असते. शाळेच्या अध्यापन पद्धतीशी विशिष्ट प्रकाशकाचेच पुस्तक सुसंगत आहे. प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी खासगी प्रकाशकांचीच पुस्तके वापरणे गरजेचे आहे, अशी कारणे शाळा देतात. परिषदेच्या पुस्तकांच्या किमती या प्रत्येक पुस्तकाशी ६० ते ७० रुपयांच्या घरात आहेत. मात्र खासगी प्रकाशकांचे एक पुस्तक दीडशे ते तीनशे रुपयांच्या घरात आहे. खासगी पुस्तकांची पानेही आणि आकारही मोठा आहे. त्यामुळे या पुस्तकांचे वजनही जास्त आहे. एका विषयासाठी काही वेळा शाळा दोन-तीन वेगवेगळी पुस्तकेही घेण्यास सांगते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही ही सगळी पुस्तके शाळेत घेऊन जावे लागते किंवा शाळेत वेगळा संच ठेवण्यासाठी दुप्पट खर्च करावा लागतो, अशी माहिती पालकांनी दिली. याशिवाय दोन-तीन वेगवेगळे गणवेश, बंधनकारक केलेल्या खेळांचे साहित्य असाही खर्च पालकांवर लादण्यात आला आहे.

‘माझी मुलगी एका खासगी शाळेत आहे. शाळेने दिल्ली येथील प्रकाशकांची पुस्तके घेण्यास सांगितले आहे. ही पुस्तकेही सर्व दुकानांमध्ये मिळत नाहीत, त्यामुळे ती शाळेतच घ्यावी लागतात. सीबीएसईच्या नवोदय, केंद्रीय विद्यालयांमध्ये मात्र परिषदेची पुस्तके वापरली जातात आणि त्या शाळांचे निकालही उत्तम आहेत. शाळांना परिषदेचीच पुस्तके वापरण्याची सक्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे सराव पुस्तके ऐच्छिक करण्यात यावीत’, असे पालक श्रीरंग सावंत यांनी सांगितले.