मुंबई : विद्यार्थ्यांच्या वाढत्या मानसिक, सामाजिक आणि भावनिक गरजांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शालेय समुपदेशन व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सीबीएसईने ‘ऑनलाइन रिमोट इन्विजिलेशन परीक्षा’ (प्रॉक्टर्ड असेसमेंट) ही नवीन मूल्यांकन पद्धती सुरू केली असून, देशभरातील सीबीएसई संलग्न शाळांमधील सुमारे १० हजार ‘काउन्सेलिंग अँड वेलनेस टीचर्स’चे टप्प्याटप्प्याने मूल्यमापन केले जाणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा फेब्रुवारी २०२६ पासून सुरू करण्यात आला आहे.

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज वाढत असताना, समुपदेशकांची गुणवत्ता, कौशल्य आणि व्यावसायिक तयारी यांचे मूल्यमापन करणे अत्यावश्यक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ही परीक्षा पारंपरिक लेखी पद्धतीपेक्षा वेगळी ठेवण्यात आली आहे. केवळ सैद्धांतिक ज्ञान न तपासता समुपदेशकांचे प्रत्यक्ष समुपदेशन कौशल्य, नैतिक मूल्यांची जाण, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्याची क्षमता यांचे सखोल परीक्षण या माध्यमातून केले जाणार आहे.

सीबीएसईने ही परीक्षा ‘डिजी-एक्झाम’ या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयोजित केली आहे. या प्लॅटफॉर्ममुळे परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि प्रमाणबद्ध होणार असून, ‘रिमोट इन्विजिलेशन’मुळे परीक्षार्थींवर ऑनलाइन देखरेख ठेवली जाणार आहे. यामुळे कॉपी किंवा गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे, तसेच देशभरातील समुपदेशकांना त्यांच्या ठिकाणावरूनच परीक्षेत सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमामागे केवळ मूल्यांकन हा उद्देश नसून, भविष्यातील डिजिटल शिक्षण व्यवस्थेशी सुसंगत अशी ‘फ्युचर-रेडी’ परीक्षा प्रणाली विकसित करण्याचाही हेतू आहे. मोठ्या प्रमाणावर सुरक्षित डिजिटल परीक्षा घेणे, मूल्यांकनातील सुसंगतता व विश्वासार्हता वाढवणे, तसेच सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करून देणे या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. राष्ट्रीय डिजिटल शिक्षण धोरणाशी सुसंगत राहून जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.

दरम्यान, सीबीएसईने सर्व संलग्न शाळांना त्यांच्या ‘सोशियो-इमोशनल काउन्सेलर्स’नी या परीक्षेत अनिवार्यपणे सहभाग नोंदवावा, असे निर्देश दिले आहेत. या परीक्षेसाठी समुपदेशकांची निवड शाळांनी ओॲसिस पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार केली जाणार असल्याने, संबंधित माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. अनेक शाळांमध्ये समुपदेशकांची माहिती अपूर्ण असल्याचे आढळून आल्याने, याबाबत विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मानसिक आरोग्य आणि भावनिक आधार अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे शालेय समुपदेशकांची गुणवत्ता उंचावणे ही काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे मूल्यमापन केल्यास अधिक सक्षम आणि प्रशिक्षित समुपदेशक तयार होतील, असे मत सीबीएसईचे सचिव हिमांशू गुप्ता यांनी व्यक्त केले.

एकूणच, शालेय शिक्षणात मानसिक आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत सीबीएसईने सुरू केलेली ही ऑनलाइन ‘प्रॉक्टर्ड’ परीक्षा प्रणाली शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचा बदल घडवणारी ठरणार असून, विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि संवेदनशील समुपदेशन सेवा मिळण्यास यामुळे चालना मिळणार आहे.