गृहनिर्माण संस्थांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक

अंमलबजावणी न केल्यास कारवाई

गुन्हे रोखण्यासाठी उपाय; अंमलबजावणी न केल्यास कारवाई

इमारतींमध्ये होणाऱ्या चोऱ्या, खून, पार्किंगवरुन होणाऱ्या हाणामाऱ्या, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडय़ा जाळण्याचे प्रकार यावर उपाय म्हणून राज्यातील सर्व रहिवाशी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करणारा आदेश पोलीस महासंचालकांनी काढला आहे. राज्यातील सर्व आयुक्त आणि अधीक्षकांना या आदेशाची अंमलबजावणी करण्यास महासंचालकांनी सांगितले असून, सीसीटीव्ही न लावणाऱ्या गृहनिर्माण संस्थांवर कारवाई करण्याच्या सूचनाही महासंचालकांनी दिल्या आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरांमधील इमारतींमध्ये एकटय़ा राहणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या हत्या, घरफोडय़ा अशा घटनांत वाढल्या आहेत. त्यातच पुणे, नाशिक शहरांमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडय़ा जाळण्याचे प्रकारही गेल्या काही महिन्यांत घडले होते. अनेक इमारतींमध्ये गाडय़ा कुठे उभ्या कराव्यात यावरुन बाचाबाची आणि प्रसंगी हाणामारीही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हे टाळण्यासाठी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना त्यांच्या हद्दीतील गृहनिर्माण संस्थांमध्ये सीसीटीव्ही संच लावणे बंधनकारक करण्याचे आदेश दिले आहेत. गृहनिर्माण संस्थांनी हे संच लावण्यात दिरंगाई किंवा टाळाटाळ केली तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही महासंचालक दीक्षित यांनी दिले आहेत. सीसीटीव्ही संच इमारतींमध्ये लावणे रहिवाशांच्याच हिताचे आहे. त्यामुळे गैरप्रकार करणारे, गुन्हेगार यांच्यावर वचक राहील, असे प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.

पोलीस महासंचालकांचे आदेश

  • इमारतीचे प्रवेशद्वार, आजूबाजूचा परिसर टप्प्यात येईल अशाप्रकारे सीसीटीव्ही लावण्यात यावेत.
  • पार्किंगच्या ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था असावी, हा परिसर पूर्ण सीसीटीव्हीच्या टप्प्यात असावा.
  • शक्य असल्यास उद्वाहन व प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही लावावेत.
  • सीसीटीव्ही चित्रीकरण साठवून ठेवण्यात येणारा सीडीआर बॉक्स सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
  • रहिवाशांची सुरक्षा लक्षात घेता सीसीटीव्ही लावण्याचा खर्च नक्कीच कमी आहे. सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही यांच्यामुळे इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षितेत वाढ होते. पोलिसांनी सांगण्यापूर्वीच नागरिकांनी स्वतहून पुढाकार घ्यावा.

– प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cctv camera mandatory in housing agencies

ताज्या बातम्या