मुंबई : बुरखा घालून सराफा पेढीमध्ये प्रवेश करून दागिने लंपास करणाऱ्या एका महिलेला एल. टी. मार्ग पोलिसांनी अटक केली. अटक महिला सराईत गुन्हेगार असून तिच्याविरोधात एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यासह शिवाजी पार्क आणि चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झवेरी बाजार येथील एका सराफाच्या पेढीत २ फेब्रुवारीला ही घटना घडली. आरोपी महिला बुरखा परिधान करून सराफाच्या पेढीत दागिने खरेदीच्या बहाण्याने आली होती. या महिलेने पेढीतील सात तोळे वजनाच्या दोन बांगड्या घेऊन पळ काढला. काही वेळानंतर येथील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले. यावेळी सीसी टीव्ही चित्रणात ही महिला चोरी करत असल्याचे समोर आले. या प्रकरणी दुकान मालकाने एल. टी. मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मात्र महिला आरोपीने बुरखा घातल्याने तिचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर काही तांत्रिक मदत घेऊन पोलिसांनी या महिला आरोपीला धारावी परिसरातून अटक केली. शायमा खान (४३) असे तिचे नाव असून ती धारावी परिसरातील रहिवासी आहे.