चर्चगेट स्टेशनवर तरूणीचा विनयभंग, अल्पवयीन तरूणाची बालसुधारगृहात रवानगी

मुंबईतला रेल्वे प्रवास मुली आणि महिलांसाठी सुरक्षित आहे की नाही?

Girl molestation, Churchgate
सीसीटीव्ही फुटेज

मुंबईत महिलांच्या सुरक्षित रेल्वे प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतो आहे. दोन दिवसांपूर्वीच सीएसटी स्थानकातल्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये अशोक प्रधान हा विकृत एका तरूणीकडे पाहून अश्लील चाळे करत होता. या घटनेची आठवण संपते ना संपते तोच आता चर्चगेट स्टेशनवर भरदिवसा तरूणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

चर्चगेट स्टेशनवर एक विद्यार्थिनी लोकलची वाट बघत उभी होती तेवढ्यात तिकडे एक मुलगा आला आणि त्याने तिला आक्षेपार्ह ठिकाणी हात लावून पळ काढला. काय घडतं आहे हे समजायच्या आत या मुलानं पळ काढल्यानं काय करावं काही क्षण विद्यार्थिनीला सुचलं नाही, पण दुसऱ्याच क्षणी तिने तातडीनं त्याचा पाठलाग करत त्याला पकडलं आणि इतर प्रवाश्यांनीही तिला मदत केली. या मुलीचा विनयभंग करणाऱ्या या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. ही घटना ८ जुलैला घडली असली तरी त्याचं सीसीटीव्ही फुटेज आज समोर आलं आहे.

पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतला असून मुलाची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. कारण हा मुलगा अल्पवयीन असून त्याचं वय १६ वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा मुलगा मूळचा मध्य प्रदेशातला असून काळाघोडा परिसरात त्याच्या बहिणीसोबत राहतो अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

मुंबईत प्रवास करणाऱ्या महिला आणि मुलींची संख्या बहुसंख्य आहे. मागच्या दोन आठवड्यांचा विचार करता ही तिसरी घटना आहे. ज्यामध्ये मुलींकडे पाहून अश्लील चाळे करण्यात आले आहेत. आता हे प्रकार थांबवण्यासाठी पोलीस आणि रेल्वे यंत्रणा अपयशी ठरते आहे का? मुलींनी आणि महिलांनी रेल्वे प्रवास करणं हे आता मुंबईतही कठीण होऊन बसलं आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न महिलावर्गाकडून विचारले जात आहेत. मागच्याच आठवड्यात एका महाविद्यालयीन तरूणीला बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेनं येताना असाच अनुभव आला होता. तिनं त्या तरूणाला हटकलं असता त्या नराधमानं सरळ तिला बलात्कार करण्याची धमकी दिली होती.

आता शनिवारी पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे. ‘न्यूज १८’ या वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार ही घटना ८ जुलैची असून त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. समाजातल्या अशा विकृतांविरोधात कडक कारवाई केल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत असंच दिसतं आहे. मात्र ठोस कारवाई काय केली जाणार आणि नेमकी कधी केली जाणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cctv footage of a girl molestation at churchgate station