वांद्र पश्चिमेला राहणाऱ्या नैना छैनानी या गृहिणीची ११ जून २०१३ मध्ये गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेने त्या वेळी प्रचंड खळबळ माजली होती. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याकांडाची उकल वांद्रे पोलिसांनी मोठय़ा शिताफीने केली.

नैना छैनानी हत्येने त्या वेळी वांद्रे परिसरात घरात एकटय़ा असलेल्या गृहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला होता. हत्या झाली त्या वेळी सोसायटीच्या आवारात सीसीटीव्ही नसल्यामुळे पोलिसांना आरोपींचा मोबाइल आणि सुरक्षा रक्षकाने दिलेले वर्णन या व्यतिरिक्त काहीही दुवा नव्हता. बऱ्याच वेळा आरोपींकडून चोरीचा मोबाइल वापरला जात असतो. त्यामुळे त्या दुव्याबाबत पोलीस साशंकच होते.  या मोबाइलमुळे आरोपी सापडले खरे, परंतु ते दोघेही मुके व बहिरे असल्यामुळे तपासातील कौशल्य पोलिसांना पणाला लावाला लागले आणि न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेव्हा तपास खरोखरच पूर्ण झाल्याचे पोलिसांना वाटले.

नैना यांचा मुलगा परदेशात वास्तव्य करीत होता. त्यामुळे वांद्रे पश्चिमेतील आलिशान फ्लॅटमध्ये छैनानी दाम्पत्य वास्तव्य करीत होते. नैना यांचे पती दररोज कामानिमित्त नवी मुंबईला जात असत. त्यामुळे त्या घरात एकटय़ा असत. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला त्या घरात घेण्याची शक्यताच नव्हती. किंबहुना सुरक्षा रक्षकाकडूनही कुठल्याही अनोळखी व्यक्तीला घरी पाठविले जात नव्हते. असे असतानाही नैना यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पत्नी फोन उचलत नसल्याने हैराण होऊन घरी आलेल्या छैनानी यांना रक्ताच्या थारोळ्यात असलेला पत्नीचा मृतदेह आढळला. घरातून दागिने आणि इतर ऐवजाची चोरी झाली होती. पैशासाठीच हत्या झाल्याचे स्पष्ट होते. वांद्रे पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे हे त्या वेळी गुन्हे विभाग सांभाळत होते. काणे यांनी तात्काळ छैनानी यांच्या घराकडे धाव घेतली. थेट घरात शिरून हत्या करण्यात आल्यामुळे ओळखीच्या व्यक्तींचाच या हत्येत सहभाग असावा, यात शंका नव्हती. परंतु या ओळखीच्या व्यक्ती कोण हे मात्र स्पष्ट होत नव्हते. ज्या पद्धतीने गळा चिरला होता तेही एकटय़ादुकटय़ाने काम नव्हते, अशी तपास अधिकाऱ्यांना खात्री होती. सुरक्षा रक्षकाकडून मिळालेल्या माहितीवरून एक बाब मात्र नक्की झाली होती, दोन आरोपी होते आणि त्यांपैकी एक आरोपी हा नियमित येणारा होता तर दुसरा एक-दोन वेळाच आलेला. तत्कालीन सहायक आयुक्त शिवाजी कोलेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक काणे आणि पथकाने तपास सुरू केला. हे आरोपी नेमके कोण होते याची माहिती नव्हती. मृतदेहाजवळ दोन मोबाइल फोन आढळले. त्यांपैकी एक नैना वापरत होत्या तर दुसऱ्या मोबाइल फोनविषयी ते काहीही सांगू शकत नव्हते. हा मोबाइल मिळाल्याने पोलिसांचे काम काही प्रमाणात सोपे झाले होते. या मोबाइलमध्ये एक संदेश होता, कम डाऊन.. हा संदेश पाठविणारा आणि तो ज्याला पाठविला या दोघांचे पत्ते पोलिसांनी मिळवले. हे पत्ते खरे आहेत किंवा नाही याची खात्री नव्हती. त्यामुळे या पत्त्यावर पोलीस पोहोचले तेव्हा परवेझ वाहिद खान तेथे आढळला. तो तर मुका-बहिरा होता. पोलीसही हबकले. मुका व बहिरा असल्यामुळे परवेझची भाषा पोलिसांना समजत नव्हती. सोबत आलेल्या सुरक्षा रक्षकाने परवेझची ओळख पटविली होती. परवेझचा हत्येशी संबंध असल्याचे प्रस्थापित करायचे होते. परवेझच्या वडिलांच्या मदतीने या हत्येविषयी पोलिसांनी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा यामध्ये आणखी एकाचा समावेश असल्याचे आढळले. परवेझला घेऊन पोलीस सैफपर्यंत पोहोचले, परंतु सैफ सासूरवाडीला गेल्याचे कळल्यानंतर मुंब्रा येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. तोही मुका आणि बहिरा असल्यामुळे आता या दोन्ही आरोपींकडून हत्येमागील नेमके कारण पोलिसांना जाणून घ्यायचे होते. दोघे आरोपी जे काही सांगायचे त्यातील काहीएक पोलिसांना कळत नव्हते. अखेर वांद्रे येथील आलियावर जंग इन्स्टिटय़ूटमधील दुभाषाची मदत घेण्यात आली. दुभाषांनी या दोघांना बोलते केले. हत्येचा घटनाक्रम त्यांनी कथित केला. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली.

या आरोपींपैकी सैफ हा नैना यांच्या मुलाचा खास मित्र. तो सतत घरी येत असे. नैना यांचा मुलगा परदेशात गेल्यानंतरही त्याचे येणेजाणे सुरू होते. नैना यांच्याकडे खूप संपत्ती आहे याची खात्री सैफला पटली होती. बेरोजगार असलेल्या सैफने परवेझच्या साथीने लुटीची योजना आखली. एक दिवस तो परवेझला घेऊन नैना यांच्याकडे गेला. परवेझ हा आपल्या बहिणीचा मुलगा असल्याचे सांगत त्याचे लग्न ठरले असून त्यामुळेच आपण मिठाई घेऊन आल्याचे नैना यांना सांगितले. सैफला चांगले ओळखत असल्यामुळे त्यांनी परवेझला आक्षेप घेतला नाही. त्यानंतर हे दोघे निघून गेले. परंतु काही दिवसांनी पुन्हा आले. या वेळी मात्र त्यांनी  लूट करण्याची योजना आखली होती. दोघे आल्यानंतर अर्थातच नैना यांनी त्यांना घरात घेतले. फळांचा रस तयार करून आणते, असे सांगून त्या आत स्वयंपाकघरात गेल्या तेव्हा दोघे पाठोपाठ गेले आणि त्यांनी वस्तऱ्याने गळा चिरला. घरातील मिळेल तो ऐवज लुटून तेथून पळ काढला. दुभाषाच्या साहाय्याने आरोपींचे कबुलीजबाब तयार झाले होते. परंतु हे न्यायालयातही टिकणे महत्त्वाचे होते.

या हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले. वांद्रे न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली. दोन्ही आरोपींचे जबाब हे महत्त्वाचे ठरणार होते. परंतु हे जबाब पोलीस अधिकाऱ्यांपुढे नोंदविण्यात आलेले असल्यामुळे न्यायालयात टिकले नसते. न्यायाधीशांनी स्वतंत्र दुभाषा बोलावून पुन्हा नव्याने या दोन्ही आरोपींचे जबाब नोंदले. त्यात साम्य आढळले. त्यानंतर या दोन्ही मुक्या व बहिऱ्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

या जबाबानुसार पोलिसांनी जमा केलेला परिस्थितिजन्य पुरावाही तेवढाच महत्त्वाचा ठरला. वांद्रे पोलिसांची ही मेहनत फळाला आली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.