मुंबई : ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून गावांना जोडणारे रस्ते यापुढे सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनातील चर्चेच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी विविध घोषणा केल्या.

ग्रामीण भागातील १४ हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. तसेच एक हजार लोकसंख्या असलेल्या सुमारे चार हजार गावांमध्ये सिमेंट काँक्रीटीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येईल. ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’ला याबाबत अर्थसाहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, पालकांचे वार्षिक आठ लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींना पदवी व पदव्युत्तरपर्यंत शिक्षणासाठी १०० टक्के सवलतीची योजना यापुढेही सुरू राहणार आहे. याबाबत खोटा प्रचार केला जात असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण सहा महिने आहे. यामध्ये पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार असून योजनेद्वारे ११ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे ते म्हणाले.

सिंचनाचा मोठा लाभ

महत्त्वाकांक्षी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा लाभ होणार आहे. वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्पांतर्गत ३१ नवीन धरणांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच ४२६ किलोमीटरचा कालवा निर्माण करण्यात येणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भात दुष्काळ दिसणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

● मुंबई महानगर क्षेत्रामधील ६० टक्के वाहतूक ही पश्चिम द्रुतगती महामार्गावरून होते.

● पश्चिम उपनगरांना विरारपर्यंत जोडण्यासाठी सागरी किनारा रस्ता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

● सागरी किनारा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गाला आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

● परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेट्रोची कामे तीन वर्षांत पूर्णत्वास

● मुंबई शहरात मेट्रोचे जाळे अधिकाधिक भक्कमपणे विणण्याचे काम सुरू आहे. देशातील सर्वांत लांब भुयारी मेट्रो मार्ग ३ जून २०२५ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येईल. पुढील तीन वर्षांत मेट्रोची कामे पूर्ण करण्यात येतील. ● भिवंडी ते ठाणे या मेट्रो मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून भिवंडी ते कल्याण मेट्रो मार्ग भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगर प्रदेशातील मेट्रो प्रकल्प दीड-दोन वर्षांत पूर्ण होतील. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.