मुंबई : मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आली असून सिमेंट कॉंक्रीट ओतण्याचे काम २० मेपासून बंद करण्यात आले आहे. रस्ते काँक्रीटीकरणाची कोणतीही नवीन काम सुरू करू नयेत. सुरू असलेली सर्व कामे ३१ मेपूर्वी सुरक्षित अवस्थेत आणावीत. रस्त्याचा काही भाग अपूर्ण असेल तर मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने ते काम पूर्ण करून रस्ते वाहतूक योग्य करावेत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. तसेच रस्ता खुला करण्यापूर्वी रस्त्यांलगतच्या पावसाळी जलवाहिनीमध्ये टॅंकरने प्रत्यक्षात पाणी टाकून त्यात अवरोध नाही ना याची खात्री करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
रस्ते खड्डेमुक्त करण्याचा संकल्प सोडत मुंबई महानगरपालिकेने रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत ७०० किमी हून अधिक रस्त्याची कामे सुरू आहेत. ही कामे अंतिम टप्प्यात आली असून पावसाळ्यापूर्वी ३१ मेपर्यंत रस्ते कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. सिमेंट कॉंक्रीट रस्त्यांची कामे आटोपती घेत असताना पावसाळ्यादरम्यान मुंबईकर नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, यास महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही बांगर यांनी सांगितले.
तर कंत्राटदाराकडून दंड वसूल करणार
कंत्राटदाराने २५ मेपर्यंत रस्ता सुरक्षित अवस्थेत आणण्यासाठी मास्टिक अस्फाल्टचे काम सुरू न केल्यास हे काम इतर उपलब्ध कंत्राटदारामार्फत संबंधित प्रकल्प ठेकेदाराच्या जोखीम व खर्चाद्वारे पूर्ण करावे. हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच, प्रकल्पस्थळ सुरक्षित अवस्थेत आणण्यासाठी केलेल्या खर्चाच्या दुप्पट रकमेएवढी दंडात्मक रक्कम संबंधित कंत्राटदाराकडून आकारण्यात यावी.
काम पूर्ण झालेल्या प्रकल्प रस्त्यांवरील पर्जन्य जलवाहिन्या नीट स्वच्छ कराव्यात. पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकून पाण्याचा प्रवाह मुक्त आहे की अवरोध आहे, हे विभाग कार्यालय व पर्जन्य जलवाहिन्या विभाग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तपासावे, असेही निर्देश अधिकाऱ्यांनी दिले.रस्त्यांवरील मलवाहिनी झाकणांची मनुष्य प्रवेशिका स्वच्छ करावी. कामाच्या वेळी पडलेले बांधकाम साहित्य / राडारोडा हटवावा. जलप्रवाह सुरळीत आहे का, हे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त तपासणीतून सुनिश्चित करावे. सर्व पर्जन्य जलवाहिन्या / सांडपाणी मनुष्य प्रवेशिकांची झाकणे तपासावी. झाकणे तुटलेली अथवा हरवलेली असल्याचे आढळल्यास ती तात्काळ बदलावी.