सहा महिन्यांत सिमेंट, स्टीलच्या दरात ४० ते ५० टक्के वाढ

बांधकामातील सर्वात मुख्य घटक म्हणजे सिमेंट आणि स्टील. सिमेंटचे ९० टक्के उत्पादन करणाऱ्या १२ कंपन्या असून त्यांची देशात मक्तेदारी आहे.

मुंबई : करोना काळात उत्पादन शुल्क वा मागणीत कोणतीही वाढ झालेली नसताना सिमेंट आणि स्टीलच्या दरात भरमसाट वाढ होत आहे. मागील केवळ सहा महिन्यांत सिमेंटच्या दरात ४० टक्क्यांनी, तर स्टीलच्या दरात ५० ते ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी, बांधकाम शुल्कात २०० ते २५० प्र.चौ. फूट रुपयांची वाढ झाली आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. ही कृत्रिम दरवाढ असून सिमेंट-स्टील कंपन्यांच्या मक्तेदारीविरोधात केंद्र सरकारकडे दाद मागण्यात येत आहे. पण केंद्राकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने आता बिल्डर-कंत्राटदारांच्या संघटनांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

बांधकामातील सर्वात मुख्य घटक म्हणजे सिमेंट आणि स्टील. सिमेंटचे ९० टक्के उत्पादन करणाऱ्या १२ कंपन्या असून त्यांची देशात मक्तेदारी आहे. तर स्टीलचे उत्पादनातही काही ठरावीक कंपन्यांची मक्तेदारी आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे या कंपन्या दरात कृत्रिम वाढ करत विकासक आणि ग्राहकांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप रेरा अ‍ॅण्ड हाऊसिंग कमिटी, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय)चे अध्यक्ष आनंद गुप्ता यांनी केला आहे. दरम्यान, विरोधात बीएआयने २०१० मध्येच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार न्यायालयाने सिमेंट कंपन्यांना ६७०० कोटी रुपये दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला कंपन्यांनी आव्हान दिले असून दंडाची १० टक्के रक्कम भरली आहे. तर अंतिम सुनावणी होईपर्यंत कोणत्याही प्रकारे कृत्रिम दरवाढ वा कृत्रिम टंचाई निर्माण करू नये, असे स्पष्ट निर्देशही दिले आहेत. पण कंपन्या मात्र आजही कृत्रिम दरवाढ आणि कृत्रिम टंचाई निर्माण करत न्यायालयाचा अवमान करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

नियंत्रण प्राधिकरण स्थापन करा

स्टील-सिमेंटच्या कृत्रिम दरवाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी मागणी बीएआयने सर्व संबंधित विभागाकडे केली आहे. मात्र सरकारकडून याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे आता बीएआयने याविरोधात सर्वोच्च न्यायालयातच अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही याचिका दाखल केली जाणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.

देशभरात दर वेगळे सिमेंटचे दर देशभरात वेगवेगळे आहेत. सिमेंटचे दर २७५ रुपये प्रति गोणीवरून ३०० ते ३२५ रुपये प्रति गोणी आहेत. तर स्टीलचे दर ३८-४० रुपये प्रति मेट्रिक टनवरून ६० ते ६५ रुपये प्रति मेट्रिक टन असे झाले आहे. एकूणच सिमेंटचे दर ४० टक्क्यांनी तर स्टीलचे दर ५० ते ५५ टक्क्यांनी वाढले आहेत. या दरवाढीमुळे बांधकाम शुल्क वाढत चालले आहे. याआधी जिथे पाच मजली इमारतीसाठी २००० ते २२०० रुपये प्रति चौरस फूट इतके बांधकाम शुल्क लागत होते, तिथे आता २५०० रुपये प्रति चौरस फूट इतके बांधकाम शुल्क लागत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cement steel prices rise by 40 to 50 percent in six months akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या