मुंबई : महापालिकेच्या शिक्षकांवर निवडणुकीसह जनगणनेच्या कामांची जबाबदारी सोपविण्यात आली असून दोन्ही भूमिका बजावताना त्यांना कसरत करावी लागत आहे. आता महापालिकेच्या विविध खात्यांमधील चतुर्थ श्रेणीतील कामगारांवरही जनगणनेच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, बहुतांश कामगारांना मोबाइलचा वापर करता येत नसल्याचे शिक्षक संघटननाचे म्हणणे आहे. जनगणनेचे सर्व काम डिजिटल पद्धतीने होणार असून माहिती संकलनात चुका झाल्यास नेमके जबाबदार कोणाला धरायचे, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

शासनाने जनगणना पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावी यासाठी नियोजन केले आहे. जनगणना दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात होईल. त्यानंतर प्रत्यक्ष जनगणना होईल. हे काम प्रामुख्याने शिक्षकांना करावे लागणार आहे. मात्र, आता महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कामगारांचीही जनगणनेच्या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

संबंधित कामगारांना जनगणनेच्या कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक अशा दोन्ही सत्रांचा समावेश आहे. विशेषतः मोबाईल ॲपद्वारे डेटा संकलन, माहितीची पडताळणी आणि घराघरांत जाऊन प्रभावी संवाद साधण्यावर भर देण्यात येणार आहे. मात्र, चतुर्थ श्रेणी कामगारांनी यापूर्वी अशा पद्धतीची कामे केलेली नाहीत. या कामामध्ये त्यांना अडचणी येण्याची शक्यता आहे. अनेक कामगारांना सुलभरित्या मोबाइलचा वापर करता येत नाही. शिक्षण कमी असल्याने त्यांना प्रभावीपणे संवाद साधता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून खासगी माहिती गोळा करणे त्यांना जमेल की नाही, याबाबत शंका आहे.

महापालिकेकडून विभाग स्तरावर कामगार – कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. वयाची ५५ वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, दुर्धर आजाराने ग्रस्त कर्मचारी, सेवानिवृत्त होणारे कर्मचारी, चतुर्थ श्रेणीतील ऑनलाईन माहिती भरण्यास सक्षम नसलेले कर्मचारी आदींची माहिती सादर न करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, असे असूनही विभाग स्तरावरून सरसकट कामगारांची माहिती महानगरपालिकेला देण्यात आल्याने चतुर्थ श्रेणी कामगारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांचीही संख्या अपुरी आहे. त्यात शिपाई व अन्य कामगार जनगणनेच्या कामासाठी गेल्यास शालेय व्यवस्थेवर ताण येण्याचीही शक्यता आहे. याबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

तीन दिवसांच्या प्रशिक्षणात लिहिता – वाचता न येणाऱ्या कामगारांना जनगणनेचे काम कसे शिकवणार? चौथी – पाचवी शिक्षण झालेल्या कर्मचाऱ्यांचीही नेमणूक झाली आहे. स्वच्छता कर्मचारी, शाळेतील शिपाई, हमाल यांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे या कामातून त्यांची सुटका करावी, अशी मागणी महापालिका कर्मचारी गौतमी सपकाळ यांनी केली.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई, माळी – कम – केअरटेकर, हमाल आदी चतुर्थ श्रेणीतील बहुतांश कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कामे करता येत नाहीत. असे असूनही त्यांच्यावर बळजबरीने जनगणनेच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर गोंधळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, असे मत प्रहार शिक्षक संघटनेचे (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष विकास घुगे यांनी व्यक्त केले.