मुंबई:- भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशांनुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदारयादीसाठी विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात एसआयआर) कार्यक्रम राबविण्याचे काम सुरु आहे. त्याचसोबत जनगणनेच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. या दोन्ही प्रकारच्या कामातून अभियंत्यांना वगळावे अशी मागणी अभियंत्यांच्या संघटनेने केली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदारयादीसाठी विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेचे तब्ब्ल ७००० कर्मचारी लागणार आहेत. त्यामुळे सर्व विभागांमधून कर्मचारी अभियंते नेमण्यात आले आहेत. या कामातून अभियंत्यांना आणि वास्तुशास्त्रज्ञांना वगळावे अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने पालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.

संघटनेचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष आणि सरचिटणीस यशवंत धुरी यांनी पत्रात म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेमध्ये सुमारे साडेचार हजार अभियंते / वास्तुशास्त्रज्ञ आहेत. तर अभियंत्यांची सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत आणि या पदांचा कार्यभार अन्य अभियंते सांभाळत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या पाणी, मलनिस्सारण, गटारे, रस्ते बांधणी – दुरुस्ती, व अन्य अभियांत्रिकी कामे जी अत्यावश्यक सेवेमध्ये येतात अशा नागरी कामामध्ये अभियंते व्यस्त असतात.

त्यामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये आणि मुंबईच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या नागरी सुविधांमध्ये पालिका अभियंत्यांवर असणारी जबाबदारी लक्षात घेता त्यांना निवडणुकीच्या कामामधून वगळण्याची संघटनेच्या विनंतीचा विचार व्हावा आणि तसे आदेश संबंधित खातेमुख्यांना द्यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

कंत्राटी मनुष्यबळ घ्यावे…

पालिकेने जनगणना, विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारयादी अद्ययावत करणे ही कामे कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मनुष्यबळ घेऊन केल्यास अभियंत्यांना आणि वास्तुशास्त्रज्ञांना या कामातून वगळता येईल, असेही या पत्रात म्हटले आहे.

२४ वर्षांनी एसआयआर…

महाराष्ट्रात यापूर्वी २००२ मध्ये म्हणजेच सुमारे २४ वर्षांपूर्वी विशेष सखोल पुनरिक्षण करण्यात आले होते. स्थलांतर, दुबार नोंदणी, मृत मतदार किंवा परदेशी नागरिकांची बेकायदेशीर नाव नोंदणी आदी कारणांमुळे मतदारयादीत सुधारणा करणे आवश्यक असते. याच अनुषंगाने, महाराष्ट्रातील अन्य भागांसोबतच बृहन्मुंबई क्षेत्रातदेखील विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विशेष सखोल पुनरिक्षण-२००२ च्या मतदारयादीतील मतदारांचा २०२४ च्या मतदारयादीतील तपशील शोधून बीएलओ अँपमध्ये मॅपिंग केले जात आहे.

जनगणना १ मेपासून

मुंबईमध्ये पहिल्या टप्प्याअंतर्गत १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना पार पडणार आहे. तसेच घरयादी व घरगणना १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत होणार आहे