आबालवृद्धांबरोबरच सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम उपनगरीय स्थानकांमध्ये सरकते जिने बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर काही स्थानकांमधील सरकत्या जिन्यांची संख्या वाढविण्यात येणार असून त्यामुळे स्थानकातून झटपट बाहेर पडणे आणि पोहोचणे शक्य होणार आहे. स्थानकांमध्ये मार्च २०२३ पर्यंत आणखी ८६ सरकत्या जिन्यांची भर पडणार असल्याची माहिती, रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. यापैकी सर्वाधिक सरकते जिने मध्ये मध्य रेल्वेवर बसविण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही प्रवासी एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर पोहोचण्यासाठी रूळ ओलांडून जातात. कार्यालयीन वेळांमध्ये पादचारीपुल प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे पुलावरुन जाण्याऐवजी प्रवासी रुळ ओलांडण्याचा धोका पत्करतात आणि काही वेळा प्रवाशांच्या जीवावर बेतते. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिक, अपंग, गर्भवती महिला यांच्यासह सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकांवर सरकते जिने आणि उद्वाहक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सध्या पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांमध्ये ८६ सरकते जिने आहेत. उपनगरीय स्थानकांमध्ये २०२३ पर्यंत आणखी १८ सरकते जिने बसवण्यात येतील, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली.

२०२३ पर्यंत आणखी ६८ जिने बसविण्यात येणार –

मध्य रेल्वे मुंबई विभागातील उपनगरीय स्थानक आणि टर्मिनसवर एकूण १०९ सरकते जिने असून प्रवाशांच्या सुविधेसाठी २०२३ पर्यंत आणखी ६८ जिने बसविण्यात येणार आहेत. यापैकी १३ जिने डिसेंबर २०२२ पर्यंत बसवण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रत्येक सरकत्या जिन्यांची किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे.

या स्थानकात बसवणार सरकते जिने –

मध्य रेल्वेवर २०२३ पर्यंत ६८ सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत विविध स्थानकांत १३ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. त्यात कांजुरमार्ग, ठाकुर्ली, भायखळा, मुलुंड, मुंब्रा आणि इगतपुरी (प्रत्येकी दोन जिने) आणि आंबिवली (एक) स्थानकांचा समावेश आहे

पश्चिम रेल्वेवरील या स्थानकात जिने बसविणार –

महालक्ष्मी, वांद्रे, वांद्रे टर्मिनस, सांताक्रुझ, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसर, वसई रोड, सफाळे, वानगाव स्थानक

१०१ सरकते जिन्यांची मंजुरी –

रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेला स्थानकांमध्ये १०१ सरकते जिने बसवण्याची मंजुरी दिली आहे. गेल्या एक – दीड वर्षात विविध स्थानकांमध्ये १०१ पैकी ३३ जिने बसवण्यात आले आहेत. तर येत्या काळात ६८ जिने बसविण्यात येणार आहेत. यातील १३ सरकते जिने येत्या डिसेंबरपर्यंत प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central and western suburban railway stations will have 86 escalators mumbai print news msr
First published on: 29-06-2022 at 12:03 IST