राज्याची केंद्राकडे दीड कोटी जादा लसमात्रांची मागणी!

लसीकरणात महाराष्ट्र  प्रथम क्रमांकावर आहे. आजघडीला तीन कोटी तीस लाखाहून अधिक लोकांचे महाराष्ट्रात लसीकरण झाले आहे.

|| संदीप आचार्य

मुंबई: केंद्र सरकारने जुलै महिन्यात महाराष्ट्राला १ कोटी १५ लाख लशींचे डोस देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र लसीकरणाची महाराष्ट्राची क्षमता व नियोजन लक्षात घेता राज्याला अधिकचे दीड कोटी डोस देण्याची मागणी आरोग्य विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे.

लसीकरणात महाराष्ट्र  प्रथम क्रमांकावर आहे. आजघडीला तीन कोटी तीस लाखाहून अधिक लोकांचे महाराष्ट्रात लसीकरण झाले आहे. केंद्र सरकारने अखंडित लसपुरवठा केल्यास राज्यातील लसीकरण नियोजित वेळेत पूर्ण करता येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.  केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात देशभरात १२ कोटी लस डोस वितरण होणार असून त्यापैकी १ कोटी १५ लाख डोस महाराष्ट्राला दिले जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात जुलै महिन्यात रोज सरासरी ३ लाख ७० हजार लोकांचे लसीकरण होऊ शकते. आरोग्य विभागाने रोज १० ते १२ लाख लोकांच्या लसीकरणाचे नियोजन केले आहे व आवश्यकतेनुसार १५ लाख लोकांना रोज लस देता येईल असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे लशीचे डोस वाया जाण्याचे प्रमाणही अन्य राज्यांच्या तुलनेत अत्यल्प आहे.

या पाश्र्वाभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी २ जुलै रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांना पत्र लिहून महाराष्ट्राला दीड कोटी जादा लशीचे डोस देण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्राची १२ कोटी लोकसंख्या लक्षात घेता २४ कोटी डोसची गरज असून आतापर्यंत पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ३ कोटी ३० लाख एवढी आहे. केंद्राकडून वेळेत लसपुरवठा होत नसल्याने गेल्या काही दिवसात राज्यातील अनेक भागातील लस केंद्रे बंद करावी लागली होती. या सर्वाचा विचार करता महाराष्ट्राला जास्तीतजास्त लशीचे डोस मिळणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Central government state government corona vaccine akp