मध्य रेल्वेच्या सर्व गाडय़ा १५ डब्यांच्या

मध्य रेल्वेवरील गाडय़ांमधील गर्दीवर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन विविध पर्यायांचा विचार करत आहे.

मध्य रेल्वेवरील गाडय़ांमधील गर्दीवर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन विविध पर्यायांचा विचार करत आहे. यात सातत्याने पुढे येणाऱ्या गाडय़ांचे डबे वाढवण्याच्या मुद्दय़ावर राइट्स नावाच्या संस्थेने सर्वेक्षण केले असून त्यांनी मध्य रेल्वेकडे गेल्या वर्षी अहवाल सादर केला आहे. या अहवालातील शिफारशींनुसार चार टप्प्यांत मध्य रेल्वेवरील सर्वच गाडय़ा १५ डब्यांच्या होऊ शकतात. त्यापैकी पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू आहे. या प्रकल्पात केवळ नवीन डब्यांच्या खरेदीची अडचण असल्याचे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे. १८५३ कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मध्य रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा मिळेल.
कामे काय काय?
सर्व स्थानकांतील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मच्या दोन्ही टोकांना असलेली सिग्नल यंत्रणा हलवावी लागेल. दोन स्थानकांमधील सिग्नलच्या अंतराबाबतही विचार करावा लागणार आहे. कारशेड आणि सायडिंग या दोन्ही जागांची पुनर्बाधणी करावी लागेल. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी विस्तारलेल्या प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल, स्थानकाबाहेर पडण्याच्या जागा या सर्वावर भर द्यावा लागणार आहे.
निधीवाटप कसे?
या सर्व प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च १८५३ कोटी रुपये एवढा आहे. त्यातील ८४० कोटी रुपये केवळ नवीन डब्बे आणि नवीन गाडय़ा विकत घेण्यासाठी लागणार आहेत. १२४ कोटी रुपयांचा खर्च प्लॅटफॉर्म आणि रेल्वेरूळ यांच्या विस्तारीकरणासाठी लागतील. ४७६ कोटी कारशेड आणि कार्यशाळा यांच्या पुनर्बाधणीसाठी खर्च होणार आहेत. तर ७७ कोटी रुपये सिग्नल यंत्रणेतील बदलांसाठी नियोजित आहेत. त्याशिवाय ओव्हरहेड वायरसाठीचा खर्च (२७ कोटी), प्रवासी सुविधांसाठी (४५-५० कोटी) असे निधीवाटप करण्यात येणार आहे.
सर्व गाडय़ा १५ डब्यांच्या करण्यासाठी आमच्यापुढे गाडय़ांच्या संख्येची अडचण आहे. सध्या आमच्याकडील आयुर्मान संपलेल्या गाडय़ा सेवेतून काढल्यास ४०० डबे कमी पडत आहेत. त्यामुळे या ४०० डब्यांची गरज भागवून मगच आम्ही सर्व गाडय़ा १५ डब्यांच्या करण्याकडे लक्ष देऊ शकतो. मात्र या योजनेसाठीची इतर तयारी आम्ही करत आहोत. पुढील काही वर्षांत मुंबईकर प्रवाशांना आम्ही नक्कीच दिलासा देऊ.
 – ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद (महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे)

प्रवाशांना फायदा काय?
मध्य रेल्वेवरील सध्याची गर्दी लक्षात घेता या प्रकल्पानंतर प्रत्येक गाडीला तीन डबे जादा मिळतील. म्हणजेच प्रत्येक गाडीची प्रवासीवहन क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे.

तोटे काय?
सर्व गाडय़ा १५ डब्यांच्या झाल्यानंतर त्या एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर जाताना लागणारा जादा वेळ, गाडीचा कमी होणारा वेग या सर्वच गोष्टींमुळे काही सेवांची संख्या कमी होईल, असा अंदाज रेल्वेतील काही अधिकारी व्यक्त करत आहेत. गाडय़ांचा वेग ताशी १०० किमीवरून ८०-८५ किमी एवढा खाली येणार आहे. त्याचा फटका जलद गाडय़ांना बसेल. त्याचप्रमाणे दोन गाडय़ांमधील वेळही चार मिनिटांवरून पाच किंवा सहा मिनिटे होणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रतितास १५-१६ ऐवजी फक्त १२ गाडय़ाच चालवणे शक्य होईल.

टप्पे काय काय?
*पहिला टप्पा – सीएसटी, दादर, ठाणे आणि कल्याण (४ स्थानके)
*दुसरा टप्पा – सीएसटी, भायखळा, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी,
भांडुप, मुलुंड आणि डोंबिवली (८ स्थानके)
*तिसरा टप्पा – माटुंगा (जलद मार्ग), कल्याण-कसारा
आणि कल्याण-खोपोली दरम्यानची सर्व स्थानके (२६ स्थानके)
*चौथा टप्पा – सीएसटी ते कल्याणदरम्यानची
सर्व स्थानके (धीमा मार्ग) (२४ स्थानके)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Central railway 15 coach

ताज्या बातम्या