मुंबई : घरातील भांडणे, कौटुंबिक समस्या किंवा शहराच्या झगमगाटाला भुलून अनेक मुले घरातून पळून रेल्वे स्थानकांवर येतात. तसेच रेल्वे परिसरातील प्रचंड रहदारीमुळे काही लहान मुलांचा हात पालकांकडून सुटतो आणि त्यांची ताटातूट होते. अशा हरवलेल्या किंवा पळून आलेल्या मुलांशी प्रशिक्षित आरपीएफ जवान संवाद साधतात. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना पालकांकडे परत जाण्यासाठी समुपदेशन करतात. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर विभागातून एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत एकूण २३५ मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून आणली आहे.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाकडे (आरपीएफ) रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. याशिवाय विविध मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. तसेच मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाद्वारे मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागात ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेद्वारे हरवलेल्या, घरातून पळून आलेल्या मुलांची स्वगृही रवानगी केली जाते. प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलाशी संवाद साधतात. त्यांच्या समस्या समजून घेऊन आणि त्यांची पालकांशी पुन्हा भेट घडवून आणतात. रेल्वेच्या या सेवेबद्दल अनेक पालक मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत आरपीएफ, रेल्वे पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांनी २३५ मुलांची स्वगृही रवानगी केली. या मोहिमेत ‘चाइल्डलाईन’ या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून अणण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत १४९ मुलांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून ५३ मुलांना स्वगृही पाठवण्यात आले. भुसावळ विभागात ६२ मुले, पुणे विभागात ५१, नागपूर विभागात ६१, सोलापूर विभागात ८ मुलांची त्यांच्या घरच्यांशी भेट घडवून आणण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरपीएफचे जवान रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याबरोबरच प्रवाशांचे प्राण वाचवण्याचे कामही तत्परतेने करतात. ऑपरेशन जीवन रक्षक या माध्यमातून प्रवाशांचे प्राण वाचवले जातात. धावत्या रेल्वेगाडीतून चढताना किंवा उतरताना अनेकवेळा प्रवाशांचा तोल जाऊन, रेल्वेगाडी आणि फलाटाच्या पोकळीत पडण्याची परिस्थिती निर्माण होते. परंतु, कर्तव्यावरील आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत १२ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. त्यात ९ पुरूष आणि ३ महिलांचा समावेश आहे.