मुंबई : मध्य रेल्वेवरील वातानुकूलित (एसी) लोकलच्या तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने समोर येत असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. एका वातानुकूलित लोकलमध्ये मंगळवारी तांत्रिक बिघाड झाल्याने नियोजित सात वातानुकूलित लोकल सेवा सामान्य लोकल रेकद्वारे चालविण्यात आल्या, त्यामुळे वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली.

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, नियमित देखभाल कामादरम्यान एका वातानुकूलित रेकमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे संबंधित फेऱ्यांसाठी वातानुकूलित रेकऐवजी सामान्य लोकल रेक उपलब्ध करून देण्यात आला. बदललेली पहिली सेवा दुपारी ४.३४ ची कुर्ला–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) धीमी लोकल होती.

सध्या मध्य रेल्वेकडे एसी लोकलचे एकूण ९ रेक असून, त्यापैकी ६ भेल आणि ३ आयसीएफ निर्मित आहेत. यापैकी आठ रेक नियमित सेवेत असतात, तर एक रेक देखभाल-दुरुस्तीसाठी राखीव ठेवला जातो. जूनअखेरीस मुख्य मार्गावर आणखी १२ फेऱ्यांचे एसी लोकलमध्ये रूपांतर केल्यानंतर मुख्य आणि हार्बर मार्गावर मिळून वातानुकूलित लोकलच्या एकूण १२० फेऱ्या सुरू आहेत. त्यामध्ये मुख्य मार्गावरील फेऱ्या ८० वरून ९२ झाल्या असून हार्बर मार्गावर २८ फेऱ्या कायम आहेत.

वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढल्या असल्या तरी त्या अजूनही मर्यादित असल्याने सर्व पासधारक प्रवाशांना कार्यालयात ये-जा करताना दोन्ही वेळा वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येत नाही. अनेक प्रवाशांनी वातानुकूलित लोकलच्या वेळापत्रकानुसार आपली कार्यालयीन वेळ निश्चित केली आहे. अशा वेळी वातानुकूलित लोकल रद्द झाल्यास त्यांना सामान्य लोकलने प्रवास करावा लागतो. वातानुकूलित लोकलचा पास किंवा तिकीटासाठी अधिक पैसे मोजूनही अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय वातानुकूलित लोकलमध्येही वाढती गर्दी असल्याने अनेकांना उभ्याने प्रवास करावा लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

सामान्य रेकद्वारे चालविण्याचे नियोजन केलेल्या लोकल सेवा :

दुपारी ४.३४ – कुर्ला–सीएसएमटी धीमी

सायंकाळी ५.१२ – सीएसएमटी–अंबरनाथ धीमी

सायंकाळी ६.१६ – ठाणे–सीएसएमटी धीमी

सायंकाळी ७.१८ – सीएसएमटी–कल्याण धीमी

रात्री ९.०४ – कल्याण–कुर्ला धीमी

रात्री ११.११ – कुर्ला–सीएसएमटी धीमी

रात्री ११.०८ – सीएसएमटी–ठाणे धीमी