मुंबई : मध्य रेल्वेवरील चिंचपोकळी-भायखळा स्थानकादरम्यान रेल्वे रुळ ओलांडताना एका प्रवाशाचा अपघात झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, पुढील तपास रेल्वे पोलिसांद्वारे केला जात आहे. परंतु, या घटनेने लोकल सेवा नियोजित वेळापत्रकाच्या २५ मिनिटे उशिराने धावत होती.
चिंचपोकळी-भायखळा स्थानकादरम्यान मंगळवारी सुमारे ३.४८ वाजण्याच्या सुमारास, जलद लोकलखाली एक प्रवासी सापडला. या घटनेची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना, आरपीएफ, रेल्वे पोलिसांना कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक ती कार्यवाही करून लोकलखाली अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दुपारी ४.१२ वाजता लोकल सेवा सुरू झाली. या अपघातात संबंधित प्रवाशाचा मृत्यू झाला असून, त्याची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे २५ मिनिटे विस्कळीत झाली. परिणामी, सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकल एका मागे एक खोळंबल्या होत्या. काही लोकल जलद मार्गावरून धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. तसेच डाऊन दिशेकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला. या घटनेमुळे सायंकाळी गर्दीच्यावेळी धावणाऱ्या लोकल अवेळी धावू लागल्या होत्या.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना होत आहेत. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण १,०६३ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात एकूण ९७८ पुरुष आणि ८५ महिला होत्या. तर, मध्य रेल्वेर ६५८ आणि पश्चिम रेल्वेवर ४०५ प्रवाशांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला. त्यानुसार, यात रेल्वे रूळ ओलांडताना दररोज सरासरी तीन प्रवाशांचा मृत्यू होतो.
गेल्या वर्षभरात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध कारणांनी दररोज सरासरी १३ प्रवाशांचा अपघात होतो. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मध्य रेल्वेवर १,४५७ आणि पश्चिम रेल्वेवर ८३० प्रवाशांचा मृत्यू झाला. असे एकूण २,२८७ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात २,०८२ पुरुष आणि २०५ महिला प्रवाशांचा समावेश आहे. याच कालावधीत मध्य रेल्वेवर १,५६५ आणि पश्चिम रेल्वेवर ९८९ प्रवासी जखमी झाले. असे एकूण २,५५४ प्रवासी जखमी झाले. यात १,९८९ पुरुष आणि ५६५ महिला प्रवाशांचा समावेश आहे. २०२५ वर्षाच्या आकडेवारीनुसार, लोकल प्रवासात दररोज ७ प्रवासी जखमी आणि ६ प्रवाशांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
