मुंबई : प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी मध्य रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यात सरकते जिने आणि उद््वाहक बसविले जात आहेत. मध्य रेल्वेने जानेवारी २०२६ मध्ये विविध स्थानकांमध्ये सरकते जिने, उद््वाहक व इतर प्रवासीभिमुख सेवा दिल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सुरक्षित आणि सुरळीत होईल.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, अपंग प्रवासी आणि इतर प्रवाशांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी, फलाट बदलण्यासाठी सरकते जिने आणि उद््वाहकाची सोय करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने जानेवारी २०२६ मध्ये प्रवाशांसाठी कसारा आणि बदलापूर येथे प्रत्येकी दोन सरकते जिने बसविले. तर, वांगणी आणि बदलापूर येथे प्रत्येकी एक उद््वाहक बसविले. विविध स्थानकांवर एकूण १४२ नवीन ब्रशलेस डायरेक्ट करंट (बीएलडीसी) पंखे बसविण्यात आले आहेत. जुने २८९ बीएलडीसी पंखे बदलण्यात आले असून तेथे नवीन पंखे बसविण्यात आले आहेत. बीएलडीसी पंखे ब्रशलेस डीसी मोटरवर काम करीत असून ते पारंपरिक इंडक्शन मोटर पंख्यांच्या तुलनेत अधिक ऊर्जा कार्यक्षम आणि कमी आवाज करणारे आहेत. या पंख्यांमध्ये कार्बन ब्रशऐवजी इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर व कायमस्वरूपी चुंबकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ऊर्जेचा वापर सुमारे ५० ते ७० टक्क्यांनी लक्षणीयरीत्या कमी होतो.
दादर स्थानकावरील वेगवेगळ्या फलाटांवर ८ नवीन हाय व्हॉल्यूम लो स्पीड (एचव्हीएलएस) पंखे बसविण्यात आले आहेत. एचव्हीएलएस पंखे मोठ्या जागेत मोठ्या प्रमाणात हवा हळूहळू फिरवून प्रभावी थंडावा व हवेशीर वातावरण निर्माण करतात. विविध स्थानकांमध्ये ३६२ नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत, तर जुने १,६३५ एलईडी दिवे बदलण्यात आले आहेत. हे एलईडी दिवे ऊर्जा कार्यक्षम असून त्यांचा वापरकाल जास्त आहे. तसेच देखभाल व बदल खर्च कमी आहे. हे दिवे अधिक चांगला प्रकाश देतात आणि पर्यावरणपूरक आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे एकूण ४ नवीन ट्रेन डिस्प्ले बोर्ड बसविण्या तआले आहेत. ज्यामध्ये २ इनडोअर डिस्प्ले बोर्ड आणि २ आउटडोअर डिस्प्ले बोर्डचा समावेश आहे. नेरुळ, पनवेल, डॉकयार्ड रोड, शिवडी, रे रोड यासह विविध स्थानकांवर एकूण ५६ नवीन उपनगरीय इंडिकेटर्स बसविण्यात आले आहेत. तसेच विविध स्थानकांवरील जुने इंडिकेटर्सही बदलण्यात आले आहेत. नवीन इंडिकेटर्स दिसायला आकर्षक असून त्यांची स्पष्टता उत्तम आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

