मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे आणि तांत्रिक बिघाडांमुळे मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा बोंबलला असला, तरी रेल्वे प्रशासन मात्र या सर्व दिरंगाईचे खापर ठाणे स्थानकातून कर्जत-कसारा या दिशेने सोडलेल्या शटल सेवांवर फोडत आहे. या सेवा ठाणे स्थानकातील फलाट तीन किंवा सात यांवरून सोडल्या जातात. मात्र त्यापुढे डाऊन धीम्या किंवा जलद मार्गावर जाण्यासाठी त्या गाडय़ांना रूळ  ओलांडावे लागतात. याचा फटका अप आणि डाऊन मार्गावरील गाडय़ांच्या वक्तशीरपणाला बसतो.
ठाणे-कल्याण या टप्प्यातील वाढलेल्या गर्दीचा आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून ठाण्याला येणाऱ्या बहुसंख्य प्रवाशांचा विचार करून रेल्वेच्या अर्थसंकल्पात ठाण्यापासून कर्जत, कसारा, आसनगाव, बदलापूर, अंबरनाथ अशा ठिकाणी जाणाऱ्या गाडय़ांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अमलबजावणी झाल्यापासून हजारो प्रवाशांना दिलासाही मिळाला आहे. संध्याकाळी गर्दीच्या वेळेत मुंबईहून गर्दीने भरून येणारी गाडी ठाण्याला पकडणे अशक्य होते. मात्र या वेळेत वाढलेल्या शटल सेवांमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला होता.
मात्र, या शटल सेवांचा फटका मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाला बसल्याचा दावा मध्य रेल्वेच्या परिचालन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक एकचा अपवाद वगळता एकाही फलाटावर गाडय़ा थांबवून त्या ‘टर्मिनेट’ करता येत नाहीत. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने फलाट क्रमांक तीन व सात येथे तशी सोय केली आहे.
मात्र या फलाटावर गाडय़ा येण्यासाठी त्यांना रूळ ओलांडावे लागतात. त्यात वेळ जातो आणि त्यामुळेच त्यांच्यामागून येणाऱ्या किंवा समोरून येणाऱ्या गाडय़ा थांबवून ठेवाव्या लागतात, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
आधी दुरुस्तीवर भर द्या
रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखभाल-दुरुस्तीतील कुचकामीपणाचा ठपका चांगल्या सेवांवर ठेवत असल्याची टीका केली आहे. ठाणे-कल्याण टप्प्यातील प्रवासी संख्येत खूप वाढ झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गामुळे ठाणे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे. या सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी शटल सेवा खूपच फायद्याच्या आहेत. अधिकाऱ्यांनी चांगल्या सेवांबाबत असे भाष्य करण्याऐवजी दर दिवशी होणारे रेल्वेचे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यावर भर द्यावी, असा सल्ला उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिला आहे.