मुंबई : नाशिक येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून सुमारे १४.५५ कोटी रुपयांचे विविध पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. देवळाली, नाशिक रोड, निफाड, खेरवाडी, लासलगाव या स्थानकात लूप लाइन वाढवणे, फलाटातील सुविधा सुधारणे, इगतपुरी, साईनगर शिर्डी स्थानकांवर सुविधा प्रदान करण्याची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत करण्याचे नियोजन आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान मध्य रेल्वेच्या विभागांनी केलेल्या यशाची आणि प्रमुख टप्प्यांची माहिती देण्यासाठी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पुरातन वारसा वास्तूचा दर्जा असलेल्या इमारतीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी व वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते.

कुंभमेळ्यादरम्यान होणारी मोठी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुविधा वाढविणे आणि मार्ग क्षमता मजबूत करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गोस्वामी यांनी मध्य रेल्वेच्या वर्षभरातील कामगिरीचाही आढावा घेतला. यावर्षी सात नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या असून त्यात वंदे भारत आणि अमृत भारत गाड्यांचा समावेश आहे. तसेच १० अतिरिक्त सेवा सुरू करण्यात आल्या असून हार्बर मार्गावर १४ वातानुकूलित लोकलची वाढ केली आहे.

रेल्वे पायाभूत सुविधांमध्येही वाढ करण्यात आली असून, ६६ नवीन थांबे विकसित केली आहे. राज्यातील पाच नवीन स्थानके उभारण्यात आली असून, आणखी १२ स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. तसेच ७७ गाड्यांचा वेग ताशी १३० किमीपर्यंत वाढविण्यात आला आहे. १६ हजार कोटी रुपयांच्या १२ योजना उपनगरीय रेल्वे मार्गात उभारण्यात येणार आहेत.

१५ डब्यांच्या फेऱ्यात होणार वाढ

मध्य रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या रेक दाखल होणार आहेत. या रेकची चाचणी करून झाल्यानंतर, प्रवाशांच्या सेवेत जून २०२६ पर्यंत १५ डब्यांची लोकल सेवा मिळेल. मेल आणि एक्स्प्रेसच्या फेऱ्यांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे ४०० फेऱ्यांचा वाढ होऊन एकूण ८,४०० फेऱ्या चालविण्यात आल्या. सणासुदीच्या काळात ३४८ विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या असून, उन्हाळी गर्दी लक्षात घेऊन १५ मार्चपासून विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

स्वयंचलित दरवाजा असलेल्या लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मुंब्रा अपघातानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ही उपाययोजना सुरू केली आहे. तसेच हार्बर मार्गावर १४ नवीन वातानुकूलित लोकल सेवा वाढविल्या असून, सध्या मध्य रेल्वेवर ९४ लोकल फेऱ्या धावत आहेत. येत्या काळात आणखी वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.