मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल सेवेत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल ताफ्यात दाखल झाली. या आधुनिक लोकलची लवकरच संशोधन, डिझाईन व मानक संस्था (आरडीएसओ) यामार्फत सविस्तर चाचणी घेतली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. परंतु, या लोकलबाबत प्रवाशांमध्ये आधीच नाखुशी दिसून येत आहे. लोकलचा वक्तशीरपणा, प्रवाशांची गर्दी आणि गुदमरवून टाकणारा प्रवास यांच्या भितीने प्रवासी वर्गाने लोकल सुरू होण्यापूर्वीच स्वयंचलित लोकलबाबत संताप व्यक्त केला आहे.

या चाचणीत लोकलची कार्यक्षमता, दरवाज्यांची सुरक्षा, आपत्कालीन परिस्थितीत होणारी कार्यवाही या बाबींचा कस लावला जाणार आहे. चाचणी यशस्वी ठरल्यास ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. मात्र, या नव्या तंत्रज्ञानासोबत काही आव्हानेही समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वयंचलित दरवाजांमुळे प्रत्येक स्थानकावर लोकल थांबण्याचा वेळ वाढू शकतो. ज्याचा परिणाम लोकलच्या वक्तशीरपणावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच गर्दीच्यावेळी दरवाजे बंद असल्याने डब्यांमध्ये हवा खेळती राहणार नाही. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास गुदमरून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असला तरी प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि वेळेचे व्यवस्थापन यांचा समतोल राखण्याचे रेल्वेसमोर मोठे आव्हान असणार आहे.

मध्य रेल्वेच्या ताफ्यात स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल दाखल झाली आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. परंतु, गर्दीचा लोंढा प्रचंड असताना, लोकलचे दरवाजे बंद होतील का, असा प्रश्न आहे. त्यासाठी वेगळे मनुष्यबळ वापरून, लोकलचे दरवाजे बंद करावे लागतील. तसेच याच जादा वेळ जाऊन लोकलचा वक्तशीरपणा मंदावेल. आधीच लोकलचा वक्तशीरपणा ढासळत चालला असून, स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल धावल्यास आणखीन वक्तशीरपणा खाली येईल. – वंदना सोनावणे, महिला प्रवासी विभाग उपाध्यक्ष, मुंबई रेल प्रवासी संघ

स्वयंचलित दरवाजे असलेल्या लोकलमध्ये हवा खेळती राहण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या असतील. परंतु, त्यात प्रवाशांची गर्दी पाहता, प्रवाशांचा गुदमरून प्रवास होईल. पाऊस पडत असताना, लोकल खिडक्यांच्या काचा बंद केल्या जातात. त्यामुळे बाहेरील हवा आत येणार नाही. त्यामुळे पाऊस पडत असताना देखील प्रवाशांचा प्रवास घामाघूम होईल. सामान्य लोकलचे रेक वाढवून, लोकल फेऱ्या वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्याद्वारे गर्दी विभाजित होऊन लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होईल. – राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना

मध्य रेल्वेच्या ताफ्यात स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल दाखल झाली आहे. या लोकलची चाचणी संशोधन, डिझाईन व मानक संस्था (आरडीएसओ)द्वारे घेतली जाईल. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. – डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

या लोकलच्या दरवाजांची उघडझाप होण्यासाठी ३ ते ४ सेकंदाचा कालावधी लागेल. परंतु, सध्या धावत असलेल्या वातानुकूलित लोकलमधील प्रवाशांच्या गर्दीमुळे दरवाजे लागत नाही. त्यामुळे प्रवाशांना ढकलण्यासाठी, सुरक्षा विभागाला तैनात करावे लागते. प्रवाशांना आत ढकलूनही दार बंद होत नसेल तर काही प्रवाशांना लोकलमधून उतरविण्यात येते. त्यामुळे स्वयंचलित लोकलला देखील हीच स्थिती बघायला मिळण्याची चिन्हे आहेत.

लोकलमध्ये रेती, सिमेंटच्या गोण्या भरून, तिची वहन चाचणी आरडीएसओद्वारे केली जाईल. सीएसएमटी ते कसारा, खोपोली, कल्याण, पनवेल या मार्गापैकी कोणत्याही मार्गावर चाचणी घेतली जाईल. मात्र, हा मार्ग प्रचंड व्यस्त असल्याने, येथे चाचणी घेणे शक्य न झाल्यास मुंबईच्या बाहेरील मार्गावर चाचणी घेण्याची शक्यता आहे. प्रत्येक ताशी किमीवर लोकलची चाचणी घेतली जाईल. त्यात लोकल कशाप्रकारे प्रतिसाद देते, त्यानुसार लोकलची चाचणी यशस्वी किंवा अयशस्वी ठरेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

लोकलची चाचणी यशस्वी झाल्यास आणि ही लोकल प्रवासी सेवेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीला कमी प्रवासी गर्दीच्या ठिकाणी ही लोकल चालवण्यात येईल. उरण-खारकोपर, नेरुळ-खारकोपर, बेलापूर या मार्गावर लोकल चालवण्यात येईल. सुरुवातीच्या काळात ही लोकल दुपारच्या सुमारास कमी गर्दीच्या वेळी चालवण्यात येईल. त्यानुसार प्रवाशांच्या प्रतिसादानुसार लोकल फेऱ्या वाढवल्या जातील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

लोकलच्या दर्शनी भागावर कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच लोकल डब्याच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसेच लोकल डब्याच्या बाहेरील बाजूस कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक कॅमेऱ्यात तीन डबे टिपण्याची क्षमता आहे. १२ डब्याच्या लोकलला आठ कॅमेरे आहेत.